अमरावती : जिल्ह्यातील चांदूर रेल्वे परिसरातील चिरोडी गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून ग्रामस्थांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पिण्याच्या पाण्यासाठी रोज संघर्ष करावा लागत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. नगर परिषदेकडून पुरवले जाणारे पाणी गढूळ व दूषित असल्याने ते वापरण्यायोग्य नसल्याची तक्रार ग्रामस्थांकडून केली जात आहे.
पाण्याच्या शोधात गावातील महिला व लहान मुले पहाटेपासून घराबाहेर पडत असून अनेक किलोमीटर अंतर पार करून पाणी आणावे लागत आहे. कडक उन्हात सुरू असलेली ही पाण्यासाठीची धडपडच आता त्यांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनली आहे.
दूषित पाण्यामुळे गावात पोटदुखी, उलट्या आणि ताप यांसारख्या आजारांचे प्रमाण वाढू लागले आहे. त्यामुळे आरोग्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे.
ग्रामस्थांनी अनेक वेळा प्रशासनाकडे तक्रारी केल्याचा दावा केला असला तरी अद्याप ठोस उपाययोजना झालेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप वाढत असून, लवकरच प्रश्न निकाली न लागल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
पाणी या मूलभूत गरजेसाठी अशी झुंज देणाऱ्या चिरोडी गावातील परिस्थितीमुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. आता या गंभीर संकटाकडे संबंधित यंत्रणा कधी लक्ष देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

