नागपूर : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या नागपूर दौऱ्यात बदलत्या जागतिक परिस्थितीत भारताच्या संरक्षण धोरणांचा सूर स्पष्ट झाला. दौऱ्यादरम्यान त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. त्यानंतर सोलर डिफेन्स अँड एअरोस्पेस लिमिटेडच्या नव्या दारुगोळा उत्पादन प्रकल्पाचे उद्घाटन त्यांनी केले.
उद्घाटन कार्यक्रमात बोलताना राजनाथ सिंह यांनी आधुनिक युद्धाच्या स्वरूपावर भाष्य केले. आजचे युद्ध केवळ रणांगणावर किंवा सीमारेषेवर मर्यादित राहिलेले नाही. ऊर्जा स्रोतांवर नियंत्रण, व्यापार युद्ध, पुरवठा साखळीतील अडथळे, तंत्रज्ञान आणि माहितीच्या माध्यमातूनही देशांमध्ये संघर्ष घडवला जातो, असे त्यांनी स्पष्ट केले.
संरक्षण उत्पादन क्षेत्रातील बदलांचा उल्लेख करताना सिंह म्हणाले की, पूर्वी हे क्षेत्र केवळ सरकारी कंपन्यांपुरते सीमित होते. खासगी उद्योग संरक्षण क्षेत्रात योगदान देऊ शकतील, यावर विश्वास नव्हता. मात्र खासगी क्षेत्राकडे आवश्यक कौशल्य, संशोधन क्षमता आणि आधुनिक दृष्टिकोन असूनही त्यांना संधी मिळत नव्हती.

आत्मनिर्भर भारत उपक्रमानंतर संरक्षण क्षेत्रात खासगी कंपन्यांना सहभागी करून घेण्यात आले. सुरुवातीला या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले, मात्र सरकारने धोरणात्मक सुधारणा करत खासगी उद्योगांना प्रोत्साहन दिले. त्याचा परिणाम म्हणून आज खासगी कंपन्या दर्जेदार, तंत्रस्नेही आणि वेळेत संरक्षण साहित्य निर्मिती करत असल्याचे संरक्षण मंत्र्यांनी सांगितले.
याच कार्यक्रमात सोलर समूहाने विकसित केलेल्या मार्गदर्शित पिनाका रॉकेट्सच्या पहिल्या तुकडीला आर्मेनियासाठी रवाना करण्यात आले. पुढील तीन महिन्यांत २३ मिमी दारुगोळ्याच्या चाचणीसाठी स्वतंत्र चाचणी रेंज सुरू होणार असल्याची माहिती कंपनीने दिली. तसेच सीमा निरीक्षण आणि लढाऊ वापरासाठी अत्याधुनिक ड्रोन विकसित करण्याच्या दिशेनेही पावले टाकली जात असल्याचे सांगण्यात आले.

