मुंबई - सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. जानेवारी महिन्यापासून सरकारी कर्मचाऱ्यांना एकाच वेळी तीन आर्थिक लाभ मिळणार असून, याचा थेट परिणाम त्यांच्या पगारावर दिसून येणार आहे. त्यामुळे शासकीय सेवेत कार्यरत कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी ही बातमी महत्त्वाची ठरणार आहे.
आठवा वेतन आयोगाची चर्चा पुन्हा सुरू-
केंद्र सरकारकडून आठवा वेतन आयोग लागू करण्याच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे. अधिकृतरित्या हा आयोग 2028 च्या सुरुवातीला लागू होण्याची शक्यता असली, तरी तो 1 जानेवारी 2026 पासून प्रभावी केला जाऊ शकतो. असे झाल्यास, कर्मचाऱ्यांना त्या कालावधीची थकबाकीही एकत्र मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्यक्षात वेतनात मोठी वाढ जाणवेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
महागाई भत्त्यात वाढ निश्चित-
आठवा वेतन आयोग लागू होईपर्यंत सातव्या वेतन आयोगानुसार महागाई भत्ता वाढ देण्यात येणार असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. यानुसार जानेवारीपासून महागाई भत्ता वाढ लागू होणार आहे.
सध्या केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना 58 टक्के दराने महागाई भत्ता दिला जात असून, आगामी वाढीत 3 ते 5 टक्क्यांची भर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे महागाई भत्ता 61 टक्के किंवा 63 टक्क्यांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. याबाबतचा अधिकृत शासन निर्णय मार्च महिन्यात, होळीच्या सुमारास जाहीर होण्याची शक्यता आहे.
महागाई भत्ता थकबाकीचाही लाभ-
महागाई भत्त्यातील वाढ जानेवारीपासून लागू राहणार असली, तरी त्याचा प्रत्यक्ष लाभ कर्मचाऱ्यांना मार्च महिन्यात मिळणार आहे. त्यामुळे मार्चच्या पगारासोबत कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्याची वाढ आणि मागील दोन महिन्यांची थकबाकी एकत्र मिळणार आहे.
एकूणच, महागाई भत्ता वाढ, त्याची थकबाकी आणि आगामी वेतन आयोगाच्या अपेक्षांमुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ होणार आहे. त्यामुळे नव्या वर्षाची सुरुवात सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक ठरण्याची चिन्हे आहेत.

