तुमसर : मकरसंक्रांतीच्या सणानिमित्त नदीवर फिरायला गेलेल्या एका १६ वर्षीय विद्यार्थ्याचा वैनगंगा नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना बुधवार रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. क्षितिज लिलाधर लांजेवार असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून तो तुमसर तालुक्यातील तामसवाडी येथील रहिवासी होता. मकरसंक्रांतीचा सण असल्याने शाळेला सुटी होती. तामसवाडी येथील रहिवासी आणि डोंगरला येथील पंडित दीनदयाल उपाध्याय विद्यालयात इयत्ता १० वीत शिकणारा क्षितिज, आपल्या दोन मित्रांसह दुपारी १ वाजेच्या सुमारास फिरण्यासाठी वैनगंगा नदीकाठी गेला होता.
तामसवाडी आणि घाटकुरोडा या दोन गावांच्या दरम्यान असलेल्या नदीच्या पात्रात क्षितिज पाण्याचा अंदाज न आल्याने खोल पाण्यात शिरला. काही क्षणातच तो प्रवाहासोबत वाहू लागला आणि खोल पाण्यात बुडाला. त्याच्यासोबत असलेल्या मित्रांनी आरडाओरडा केला, मात्र मदत मिळेपर्यंत क्षितिज पाण्यात अदृश्य झाला होता.
घटनेची माहिती मिळताच तामसवाडी येथील नागरिकांनी नदीकाठी धाव घेतली. शोधमोहीम राबवली असता क्षितिजचा मृतदेह हाती लागला. अवघ्या १६ वर्षांच्या मुलाचा असा दुर्दैवी अंत झाल्याने संपूर्ण तामसवाडी गावावर शोककळा पसरली आहे. क्षितिज हा अभ्यासात हुशार होता, त्याच्या निधनाने लांजेवार परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

