मुंबई: एप्रिल २०२६ मध्ये महाराष्ट्रातील सात राज्यसभा खासदारांचा कार्यकाळ संपत असून या पार्श्वभूमीवर होणारी राज्यसभा निवडणूक राजकीयदृष्ट्या महत्त्वाची ठरणार आहे. विधानसभेतील सध्याच्या संख्याबळाचा विचार करता या निवडणुकीत महायुतीचं पारडं जड राहणार असल्याचं चित्र आहे. त्यामुळे भाजपाचं राज्यसभेतील संख्याबळ वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवाराला ३७.५ आमदारांची मते आवश्यक असतात. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीची ताकद लक्षणीयरीत्या कमी झाली आहे. या बदललेल्या गणितामुळे यावेळी महाविकास आघाडीच्या वाट्याच्या काही जागा महायुतीकडे जाण्याची शक्यता आहे.
सध्याच्या आकडेवारीनुसार सात जागांपैकी सहा जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून येऊ शकतात. यात भाजपाच्या चार, राष्ट्रवादी (अजित पवार गट) एक आणि शिंदेसेनेच्या एका जागेचा समावेश आहे. उर्वरित एक जागा महाविकास आघाडीला मिळण्याची शक्यता आहे. पुरेशा मतांमुळे काही जागांवर बिनविरोध निवडणूक होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.
दरम्यान, शरद पवार यांच्या राज्यसभा प्रवेशावरून राजकीय चर्चांना वेग आला आहे. शरद पवारांसारखा ज्येष्ठ नेता दिल्लीत असणं महाराष्ट्रासाठी गरजेचं असल्याचं मत शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे. महाविकास आघाडीकडे पवारांना निवडून आणण्यासाठी आवश्यक संख्याबळ असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
महाराष्ट्रात राज्यसभेच्या एकूण १९ जागा आहेत. सध्या त्यापैकी १२ जागा एनडीएकडे तर सात जागा महाविकास आघाडीकडे आहेत. येत्या २ एप्रिल २०२६ रोजी शरद पवार, फौजिया खान, प्रियंका चर्तुवैदी, रजनी पाटील, धैर्यशील पाटील, भागवत कराड आणि रामदास आठवले यांचा कार्यकाळ संपणार आहे. त्यामुळे एप्रिलमधील राज्यसभा निवडणूक राज्याच्या राजकारणात नवी दिशा देणारी ठरणार आहे.

