नागपूर-
मकर संक्रांती हा हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा आणि वैज्ञानिक आधार असलेला सण मानला जातो. हिंदू पंचांगानुसार, पौष महिन्यात सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करतात, तेव्हापासून उत्तरायणाची सुरुवात होते. यंदा १४ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजून १३ मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करणार असून, त्याच दिवशी देशभरात मकर संक्रांती साजरी केली जाणार आहे.
कापणीचा उत्सव, नवीन सुरुवात आणि सूर्यऊर्जेचे स्वागत असा हा सण मानला जातो. तीळ-गूळ वाटप, दानधर्म, गंगास्नान, हळदीकुंकू आणि खास पदार्थांसोबतच पतंग उडवण्याची परंपरा मकर संक्रांतीची खास ओळख आहे. मात्र, या पतंगबाजीमागे केवळ करमणूक नाही, तर धार्मिक, ऐतिहासिक आणि वैज्ञानिक कारणे दडलेली आहेत.
धार्मिक मान्यता काय सांगते?
धार्मिक कथांनुसार, मकर संक्रांतीच्या दिवशी भगवान श्रीरामांनी पहिला पतंग उडवला, अशी श्रद्धा आहे. राम पतंग उडवत असताना तो इतका उंच गेला की थेट इंद्रलोकात पोहोचला, अशी कथा सांगितली जाते. रामचरितमानसच्या बालकांडात याचा उल्लेख आढळतो —
‘राम इक दिन चंग उड़ाई।
इंद्रलोक में पहुँची जाई॥’
याच श्रद्धेमुळे संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवण्याची परंपरा रूढ झाली, असे मानले जाते.
वैज्ञानिक दृष्टिकोनातून पतंगबाजीचे महत्त्व-
मकर संक्रांतीच्या सुमारास हिवाळा ओसरू लागतो आणि सूर्यप्रकाशाची तीव्रता वाढते. या काळात पतंग उडवताना माणूस उन्हात अधिक वेळ राहतो. त्यामुळे शरीराला नैसर्गिक व्हिटॅमिन डी मिळते, जे हाडे मजबूत ठेवण्यासाठी, रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त ठरते.
यासोबतच पतंग उडवताना हात-पायांची हालचाल वाढते, शरीर सक्रिय राहते आणि मानसिक तणावही कमी होतो. त्यामुळे ही परंपरा केवळ सणापुरती मर्यादित न राहता आरोग्यदायी सवय ठरते.
पतंग उडवण्याची परंपरा किती जुनी?
इतिहास पाहता, पतंग उडवण्याची परंपरा सुमारे २ हजार वर्षे जुनी असल्याचे सांगितले जाते. चीनमध्ये सुरुवातीला पतंगांचा वापर संदेशवहन आणि लष्करी संकेतांसाठी केला जात असे. पुढे फाहियान आणि ह्युएन त्सांग यांसारख्या चिनी प्रवाशांमुळे ही कला भारतात पोहोचली. मुघल काळात पतंगबाजी लोकप्रिय झाली आणि कालांतराने ती सण-उत्सवांचा अविभाज्य भाग बनली.
सामाजिक संदेश देणारा सण-
मकर संक्रांतीचा गाभा म्हणजे “तिळगूळ घ्या, गोड गोड बोला”. मतभेद विसरून आपुलकी, सलोखा आणि सामाजिक एकोपा वाढवण्याचा हा सण आहे. महाराष्ट्रात तिळगूळ वाटप, हळदीकुंकू, पतंगबाजी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. तर देशभरात हा सण लोहडी, पोंगल, भोगाली बिहू अशा विविध नावांनी ओळखला जातो.
निसर्गाशी नाते जोडणारा उत्सव-
मकर संक्रांती आपल्याला निसर्गाशी सुसंवाद साधण्याचा, आरोग्य जपण्याचा आणि सकारात्मक विचारांचा संदेश देते. त्यामुळेच पतंग उडवणे ही केवळ करमणूक न राहता, परंपरा, श्रद्धा आणि विज्ञान यांचा सुंदर संगम ठरतो.

