तुमसर (९ जानेवारी, भंडारा) : तुमसर–मोहाडी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार चरण वाघमारे यांच्या वाढदिवसानिमित्त 'द ग्लेन यार्ड्स रिसोर्ट' कांद्री येथे विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या कार्यक्रमांतर्गत आयोजित रक्तदान शिबिरात ९५ रक्तदान रक्तदात्यांनी स्वेच्छेने केले. सदर रक्तदान शिबिर यशस्वी होण्यासाठी शासकीय रुग्णालयात भंडाराचे रक्तपेढींच्या चमूंनी विशेष मेहनत घेत रक्तदात्यांना रक्तदानासाठी प्रभावीपणे प्रोत्साहित केले. त्यांच्या समर्पित कार्यामुळे रक्तदान शिबिर उत्साहात व यशस्वीरीत्या पार पडले.
तसेच सुप्रसिद्ध डॉ. महात्मे यांच्या वैद्यकीय चमूच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या नेत्र तपासणी शिबिराचा लाभ १७२ महिला व पुरुषांनी घेतला.
या कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ११ वाजता गौमाता पूजनाने करण्यात आली. त्यानंतर रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिरांचे उद्घाटन माजी आमदार चरण वाघमारे, त्यांच्या परिवारातील सदस्य तसेच उपस्थित पदाधिकारी व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कांद्री येथे कृषी पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यात आलेल्या नैसर्गिक, शांत व आरोग्यदायी वातावरणात हा कार्यक्रम पार पडला. जिल्ह्याच्या विविध भागांतून आलेल्या चरण वाघमारे यांच्या मित्रपरिवार, हितचिंतक व कार्यकर्त्यांनी दिवसभर नैसर्गिक परिसराचा आनंद घेत वाढदिवस उत्साहपूर्ण व आनंदी वातावरणात साजरा केला.या सामाजिक उपक्रमांमुळे सर्वसामान्य नागरिकांना आरोग्य सेवांचा थेट लाभ मिळाल्याने उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.

