साखळी : मिनरल फाऊंडेशन ऑफ गोवा आणि संपूर्ण(अ) र्थइन्व्हरमेंट सोल्युशनस यांच्यातर्फे गोदरेज कंझ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेड यांच्या सीएसआर निधीतून गोव्यात राबविण्यात आलेल्या स्मार्ट वेस्ट चॅम्पियन पुरस्कारांचे वितरण उत्साहात संपन्न झाले.
या कार्यक्रमासाठी गोवा घनकचरा व्यवस्थापन महामंडळ व गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळ यांचे सहकार्य लाभले. या स्पर्धेत स्मार्ट वेस्ट चॅम्पियन स्पर्धेअंतर्गत नवदुर्गा हायस्कूल (पाळे) व युनिटी हायस्कूल (वाळपई) यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. तसेच मावशी, हरवळे, पर्ये व दवरली - ठाणे ग्रामपंचायतींसह साखळी नगरपालिकेचाही विशेष गौरव करण्यात आला.
यावेळी बोलताना साखळी नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सिद्धी परब यांनी साखळी नगरपालिका सौरऊर्जेवर चालणारी स्वयंपूर्ण संस्था असल्याचे सांगितले. स्वच्छतेबाबत नागरिकांनी जागरूक राहावे, प्लास्टिकमुळे होणाऱ्या आजारांबाबत जनजागृती आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. पंचायतींसोबत करार करून कचरा व्यवस्थापन अधिक सक्षम करण्याचा प्रस्तावही त्यांनी मांडला.

गोवा घनकचरा व्यवस्थापन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक हरीश अडकोणकर यांनी हा प्रकल्प गोव्यासाठी एक शाश्वत व आदर्श प्रकल्प असल्याचे नमूद केले. साखळी व डिचोली येथील नागरिकांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे सांगत अशा उपक्रमांची सातत्याने अंमलबजावणी होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छतेसंदर्भातील उपक्रम राबवले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संशोधक लिबिया डिसिल्वा यांनी कचरा वर्गीकरणात स्थानिक स्वराज्य संस्थांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले. मिनरल फाउंडेशन ऑफ गोवा मार्फत दोन तालुक्यांमध्ये ॲप आधारित देखरेख प्रणाली राबवण्यात येत असून इतर तालुक्यांनीही त्याचा आदर्श घ्यावा, असे त्यांनी सुचविले.
यावेळी बोलताना गोदरेज कंझ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेडच्या अहोना घोष यांनी प्रकल्पाचा आढावा घेताना सांगितले की, शहरी भारतात दरवर्षी सुमारे ४२ मिलियन टन कचरा निर्माण होत असून ही समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत आहे. या पार्श्वभूमीवर मिनरल फाउंडेशन ऑफ गोवा आणि संपूर्ण अर्थ एन्व्हायर्नमेंट सोल्यूशन्स यांच्या सहकार्याने गोव्यात प्रभावी काम करता आले. आतापर्यंत ७ कम्युनिटी वेस्ट मॅनेजमेंट प्रकल्प राबवले असून १२ नगरपालिकासोबत समन्वय साधण्यात आला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांना मार्गदर्शन, पारदर्शकता आणि “वेस्ट टू वर्थ” या संकल्पनेवर विशेष भर देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
मिनरल फाउंडेशन ऑफ गोवाचे प्रकल्प अधिकारी पराग रांगणेकर यांनी प्रकल्पातील विविध उपक्रमांचा सविस्तर आढावा घेतला. २०१२ साली सुरू झालेल्या या उपक्रमाने २०१८ पासून १२ पंचायतींमध्ये काम विस्तारले. सुमारे ४० हजार घरांवर क्यूआर कोड प्रणाली राबवण्यात आली असून दररोज ३.५ ते ४ टन कचरा हाताळला जात आहे. ५० आरोग्य शिबिरे घेण्यात आली असून १३०० लोकांना सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ देण्यात आला आहे. साडेचार हजारहून अधिक लोकांना सुरक्षा किटचे वितरण करण्यात आले. घरातूनच ८० टक्के कचरा वर्गीकृत व्हावा यासाठी प्रयत्न करण्यात आले. १७०० हून अधिक उपक्रम राबवत ३० हजारांपेक्षा अधिक नागरिकांपर्यंत पोहोचण्यात यश मिळाले. शाळा, महाविद्यालये व महिलांसोबत विविध उपक्रम राबवण्यात आले असून १६ शाळांमध्ये दूध पिशव्यांचे संकलन करण्यात आले. प्रकल्प संपला असला तरी पुढेही काम सुरू राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.
मिनरल फाउंडेशन ऑफ गोवा चे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन तेंडुलकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. साखळी नगरपालिकेच्या सभागृहात हा समारंभ पार पडला.
स्मार्ट वेस्ट चॅम्पियन स्पर्धेअंतर्गत नवदुर्गा हायस्कूल (पाळे) व युनिटी हायस्कूल (वाळपई) यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. तसेच मावशी, हरवळे, पर्या व डवरली-ठाणे ग्रामपंचायतींसह साखळी नगरपालिकेचाही विशेष गौरव करण्यात आला.
कार्यक्रमात विविध मान्यवरांचा सत्कारही करण्यात आला. यामध्ये विजयकुमार नाटेकर, ओंकार मांजरेकर, समृद्ध हेगडे देसाई, राजदत्त मापारी, राधिका गावकर, श्रावणी राऊत, हेमा पेटकर, दीपक विश्वकर्मा, प्रसन्ना घाटवळ, अनिता सालेलकर, पूनम गावस, आनंद गावस, इरम खत्री, जयश्री देसाई, अपर्णा एन. पी., राहुल गावकर, साईशा सावंत आदींचा समावेश होता.
कार्यक्रमासाठी मिनरल फाउंडेशनच्या श्रद्धा रांगणेकर, संपूर्ण अर्थ एन्व्हायर्मेंट सोल्युशनचे देबार्था बॅनर्जी, तेजश्री कुंभार, गोवा घनकचरा व्यवस्थापन महामंडळाचे रोहन घाडी, गोदरेज कंझ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेडच्या आरती कदम तसेच सफाई कर्मचारी उपस्थित होते.

