मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार Rohit Sharma याचा एक खास व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अभिनेत्री नम्रता संभेराव आणि ‘थेट तुमच्या घरातून’ या नाटकाच्या टीमसोबत त्याने साधलेला मराठी संवाद महाराष्ट्रभर चर्चेचा विषय ठरला आहे. “मुंबईत राहतो तर मराठी येणारच” या एका वाक्याने रोहितने चाहत्यांची मने जिंकली आहेत.
क्रिकेटच्या मैदानावर ‘हिटमॅन’ म्हणून ओळखला जाणारा रोहित सध्या स्पर्धात्मक क्रिकेटपासून थोडासा दूर असला तरी त्याच्याशी संबंधित प्रत्येक घडामोड चाहत्यांसाठी आकर्षण ठरते. अलीकडेच गाजत असलेल्या ‘थेट तुमच्या घरातून’ या मराठी नाटकाच्या कलाकारांची त्याच्याशी एका रेस्टॉरंटमध्ये भेट झाली. या भेटीचा व्हिडीओ नम्रता संभेरावने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये अभिनेता प्रसाद खांडेकर आणि नाटकातील इतर कलाकारही दिसून येतात.
व्हिडीओमध्ये कलाकार मंडळी गप्पांमध्ये रंगलेली असताना अचानक रोहित शर्मा तिथे येतो आणि त्याला पाहताच सर्वजण आश्चर्यचकित होतात. वातावरणात उत्साह आणि आनंदाची लहर पसरते. सर्वजण त्याच्यासोबत निवांत गप्पा मारताना दिसतात.
या भेटीत नम्रता संभेराव रोहितला मराठीत विचारते, “कसे आहात तुम्ही?” त्यावर रोहित हसत “मी मजेत आहे” असे उत्तर देतो. त्यानंतर ती त्याला सांगते की तो अनेकदा मराठीत बोलताना दिसतो, म्हणूनच तिने मराठीत संवाद साधला. यावर रोहितने दिलेले उत्तर सर्वांचे लक्ष वेधून घेणारे ठरले. “काही नाही, समजते मला! मुंबईमध्ये राहतो तर मराठी तर येणारच!” असे तो सहजपणे म्हणतो.
त्याच्या या प्रतिक्रियेमुळे उपस्थित कलाकार थक्क झाले, तर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी त्याचे भरभरून कौतुक केले आहे. साधेपणा आणि मराठी भाषेबद्दलचा जिव्हाळा यामुळे रोहित पुन्हा एकदा चाहत्यांच्या मनात घर करून गेला आहे.
रोहित शर्मा मूळचा नागपूर येथील असला तरी त्याचे बालपण आणि क्रिकेट कारकीर्द मुंबई येथेच घडली. पत्रकार परिषदांमध्ये किंवा सामन्यादरम्यान स्टम्प माईकमधून त्याचे मराठी शब्द अनेकदा ऐकू येतात. मात्र या वेळी त्याने ज्या आत्मीयतेने मराठीत संवाद साधला, त्यामुळे महाराष्ट्राशी असलेले त्याचे नाते पुन्हा अधोरेखित झाले आहे.

