नवी दिल्ली : लॉटरी लागल्यानंतर बहुतांश जण रक्कम गुप्त ठेवण्याचा प्रयत्न करतात. मात्र कर्नाटकातील एका तरुणाने याला अपवाद ठरवत, लॉटरीत जिंकलेली कोट्यवधींची रक्कम मित्रांमध्ये वाटण्याचा निर्णय घेतला आहे.
शांतनु शेट्टीगर असे या तरुणाचे नाव असून तो कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यातील कटपडी मट्टू गावचा रहिवासी आहे.
फोनवर मिळाली आनंदाची बातमी-
एनआरआय असलेल्या शांतनु शेट्टीगर याने अबू धाबी येथे झालेल्या बिग टिकट लकी ड्रॉमध्ये तब्बल २ कोटी दिरहम (सुमारे ४९ कोटी रुपये) जिंकले आहेत. हा ड्रॉ लाईव्ह प्रक्षेपणाद्वारे दाखवण्यात आला होता. अचानक आलेल्या फोन कॉलमधून शांतनुला या मोठ्या विजयाची माहिती मिळाली.
सध्या ओमानमध्ये कार्यरत-
शांतनु सध्या ओमानमधील मस्कट शहरात कार्यरत आहे. त्याने तिकीट क्रमांक 305810 (सीरिज 283) खरेदी केले होते. आयोजकांशी संवाद साधताना तो म्हणाला, “या विजयामुळे मी खूप आनंदी आहे, मात्र या रकमेचा नेमका उपयोग कसा करायचा याचा निर्णय अजून घेतलेला नाही.”
मित्रांमध्ये पैसे वाटणार-
शांतनुने सांगितले की, हे तिकीट त्याने एका मित्रासोबत मिळून खरेदी केले होते. बिग टिकटच्या नियमानुसार, जिंकलेली संपूर्ण रक्कम दोघांमध्ये समान वाटली जाणार आहे. त्यामुळे हा विजय केवळ शांतनुचाच नाही, तर त्याच्या मित्राचाही आहे.
पाच वर्षांच्या प्रयत्नांचे फळ-
भावूक प्रतिक्रिया देताना शांतनु म्हणाला, “माझ्या मुलीमुळेच माझे नशीब बदलले असे मला वाटते. या विजयाची मला अजिबात अपेक्षा नव्हती.”
विशेष म्हणजे, शांतनु गेल्या पाच वर्षांपासून बिग टिकटमध्ये सहभागी होत होता. सुरुवातीला अधूनमधून तिकीट खरेदी करणाऱ्या शांतनुने गेल्या तीन वर्षांत एकही ड्रॉ चुकवलेला नाही. अखेर सातत्याच्या प्रयत्नांना यश आले आणि तो रातोरात कोट्यधीश बनला.

