नागपूर- सोने आणि चांदीच्या दरांबाबत घसरणीचे अंदाज सध्या पूर्णपणे चुकीचे ठरत आहेत. बाजारात मौल्यवान धातूंनी जबरदस्त उसळी घेतली असून दररोज नवे विक्रम नोंदवले जात आहेत. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी चांदीच्या किमतींनी इतिहास घडवला. प्रथमच एक किलो चांदीचा दर 3 लाख रुपयांच्या वर गेला आहे.
एमसीएक्सवर मार्च डिलिव्हरीच्या चांदीच्या वायदा करारात मोठी वाढ पाहायला मिळाली. चांदीच्या दरात ₹13,550 म्हणजेच 5 टक्क्यांपेक्षा अधिक वाढ होत ती थेट ₹3,01,315 प्रति किलो या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचली. जानेवारी महिन्यातच चांदीच्या किमतीत ₹65,614 प्रति किलोची भर पडली आहे. वर्षअखेरीस म्हणजे 31 डिसेंबर 2025 रोजी चांदीचा दर ₹2,35,701 प्रति किलो होता.
चांदीप्रमाणेच सोन्याच्या किमतींनीही वेग पकडला आहे. एमसीएक्सवर फेब्रुवारी महिन्यातील सोन्याचा वायदा दर गेल्या शुक्रवारी प्रति 10 ग्रॅम ₹1,42,517 वर स्थिरावला होता. मात्र सोमवारी व्यवहार सुरू होताच सोन्याने झपाट्याने वाढ घेत प्रति 10 ग्रॅम ₹1,45,500 हा नवा विक्रमी टप्पा गाठला. एका सत्रात सोन्याच्या दरात जवळपास ₹3,000 रुपयांची वाढ झाली आहे.
वर्षाच्या सुरुवातीपासून सोन्याच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. 31 डिसेंबर 2025 रोजी 10 ग्रॅम सोन्याचा दर ₹1,35,804 होता. आतापर्यंत सोन्याच्या दरात एकूण ₹9,696 प्रति 10 ग्रॅमची वाढ नोंदवण्यात आली आहे.
सोने-चांदीच्या दरातील या प्रचंड वाढीमुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्सुकता वाढली असून सुरक्षित गुंतवणुकीकडे पुन्हा एकदा कल वाढताना दिसत आहे.

