मुंबई : गेल्या काही दिवसांतील घसरणीनंतर सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा वाढ होत असल्याचे चित्र समोर आले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याने महत्त्वाचा टप्पा ओलांडला असून चांदीच्या दरातही लक्षणीय वाढ नोंदवली गेली आहे. या अचानक झालेल्या वाढीमुळे गुंतवणूकदारांचे लक्ष पुन्हा या धातूंवर केंद्रीत झाले आहे.
माहितीनुसार, सोन्याच्या दरात सुमारे दीड टक्क्यांची वाढ होत प्रति औंस ४,६१८ डॉलर्सपर्यंत मजल मारली आहे. तर चांदीच्या दरात सुमारे ३.७ टक्क्यांची वाढ होऊन ती प्रति औंस ७३.२ डॉलर्सवर पोहोचली आहे. दरम्यान, महावीर जयंतीनिमित्त ३१ मार्च रोजी सकाळच्या सत्रात वायदा बाजार बंद राहणार असला तरी संध्याकाळी व्यवहार पुन्हा सुरू होणार आहेत.
तज्ज्ञांच्या मते, यापूर्वी जवळपास १५ टक्क्यांच्या घसरणीनंतर सोन्याचे दर आकर्षक पातळीवर आले होते. त्यामुळे गुंतवणूकदारांनी खरेदीची संधी साधत मोठ्या प्रमाणात खरेदी केली, ज्यामुळे दरात पुन्हा मजबुती आली.
या वाढीमागे मध्य पूर्वेतील वाढता तणाव हे एक प्रमुख कारण मानले जात आहे. त्या भागातील संघर्षामुळे जागतिक शेअर बाजारांमध्ये अस्थिरता निर्माण झाली असून गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याकडे वळत आहेत. तसेच तेल पुरवठ्यावर निर्माण झालेल्या संकटामुळेही आर्थिक अनिश्चितता वाढली आहे.
याशिवाय, अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेकडून आलेल्या संकेतांमुळेही बाजाराला आधार मिळाला आहे. चलनवाढ नियंत्रणात असल्याचे आणि व्याजदरात तातडीने वाढ होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आल्याने सोन्यासाठी सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.
एकूणच, जागतिक घडामोडी आणि गुंतवणूकदारांचा वाढता कल यामुळे सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा तेजीचे वातावरण निर्माण होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

