CCTV च्या निगराणीत शालांत परीक्षा...
तुमसर (७ फेब्रुवारी, भंडारा) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, नागपूर विभाग यांच्या निर्देशानुसार कॉपीमुक्त जनजागृती अभियान अंतर्गत विद्यार्थी–पालक–शिक्षक विचारमंथन सभेचे आयोजन शारदा विद्यालय व कन्या कनिष्ठ महाविद्यालय, बजाज नगर, तुमसर येथे करण्यात आले.
शालांत परीक्षेच्या पार्श्वभूमीवर बोर्डाच्या नियमांचा ठाम उल्लेख करत परीक्षा केंद्रांवर CCTV कॅमेऱ्यांद्वारे प्रत्येक हालचाल टिपली जाणार असून कोणत्याही प्रकारच्या कॉपीला शून्य सहनशीलता राहणार आहे. “शालांत परीक्षा ही विद्यार्थ्यांची कसोटी नसून त्यांच्या आत्मविश्वासाची परीक्षा आहे. प्रामाणिक अभ्यासाने
विद्यार्थी सहज उत्तीर्ण होतो. कॉपी हा गुन्हा असून तो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ आहे,” असे ठाम प्रतिपादन प्राचार्य डोंगरे यांनी केले.
बोर्डाच्या नियमांनुसार परीक्षा केंद्रावर मोबाईल फोन, स्मार्ट वॉच, ब्लूटूथ, चिठ्ठ्या व इतर इलेक्ट्रॉनिक साधने पूर्णतः प्रतिबंधित असून नियमभंग केल्यास महाराष्ट्र बोर्डाच्या नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येणार आहे. पारदर्शक, शिस्तबद्ध व भयमुक्त परीक्षा राबविणे ही विद्यार्थी, पालक व शिक्षक यांची सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.“विचाराला कृतीची जोड द्या, संविधानिक मार्ग स्वीकारा, यश निश्चितच तुमच्या हातात आहे,” असा प्रेरणादायी संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

यावेळी शिक्षकवृंद ज्योती बालपांडे, दिपक गडपायले, श्रीराम शेंडे, संजय बावनकर, नितुवर्षा मुकुर्णे म्हणाले की, परीक्षा काळात पाल्यांवर कोणताही मानसिक दबाव न आणता त्यांच्या अभ्यासास पोषक वातावरण निर्माण करावे व आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे. सभेला शिक्षक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महादेव हट्टेवार, चैतन्य माटे, हितेश तरारे यासह उपस्थित पालकानी कॉपीमुक्त व भयमुक्त परीक्षा अभियान यशस्वी करण्याचा संकल्प व्यक्त केला. संचालन व आभार प्रदर्शन श्रीराम शेंडे यांनी केले.

