नवी दिल्ली: दिल्ली पोलिसांनी अमली पदार्थांविरोधातील कारवाईत मोठं यश मिळवत, दिल्लीतील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या ड्रग्स छाप्यांपैकी एक कारवाई करत ५० कोटी रुपयांहून अधिक किमतीचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. या कारवाईत आंतरराज्यीय ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश झाला असून, या प्रकरणात सात जणांना अटक करण्यात आली आहे.
दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांमध्ये सक्रिय असलेलं हे रॅकेट बेकायदेशीररित्या प्रतिबंधित सायकोट्रॉपिक औषधांच्या निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल खरेदी करत असल्याचं तपासात उघड झालं आहे. हे पदार्थ पुन्हा पॅक करून वैद्यकीय प्रिस्क्रिप्शनशिवाय विविध राज्यांमध्ये पुरवले जात होते.
पोलिसांच्या माहितीनुसार, या प्रकरणाचा उलगडा मागील वर्षी सप्टेंबरमध्ये मिळालेल्या गुप्त माहितीनंतर झाला. मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थांची तस्करी होणार असल्याचा इशारा मिळाल्यानंतर, पोलिसांनी सखोल तपास सुरू केला.
कारवाईदरम्यान पोलिसांनी सर्वप्रथम दिल्लीच्या लाजपत नगर परिसरातून अनिरुद्ध राय याला अटक केली. त्याच्याकडून सुमारे २ किलो ट्रामाडॉल पावडर जप्त करण्यात आली. ट्रामाडॉल हे ओपिऑइड प्रकारचं औषध असून, एनडीपीएस कायद्याअंतर्गत कडक नियंत्रणाखाली आहे.
यानंतर उत्तर प्रदेशातून मनोज राय याला अटक करण्यात आली. त्याच्या चौकशीनंतर पोलिसांनी किशन पाल उर्फ भुल्लर याला दिल्लीमधून ताब्यात घेतलं. त्याच्या घराच्या झडतीत ५०३ ग्रॅम अल्प्राझोलाम हा प्रतिबंधित अँटी-ॲन्झायटी औषधाचा साठा आढळून आला.
तपास पुढे नेत पोलिसांनी कृष्णा तन्वर यालाही अटक केली. तसेच, हरियाणातील सिंघू सीमेवरून मनोज कुमार याला पकडण्यात आलं असून, त्याच्या वाहनातून सुमारे ५ किलो ट्रामाडॉल जप्त करण्यात आलं आहे.
यानंतर पोलिस पथकांनी हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये छापे टाकत प्रशांत आणि अमित या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून प्रतिबंधित औषधांच्या निर्मितीसाठी वापरण्यात येणारी मोठ्या प्रमाणात सायकोट्रॉपिक पावडर जप्त करण्यात आली आहे.
दिल्ली पोलिसांनी स्पष्ट केलं आहे की, या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू असून, आणखी अटकांची शक्यता नाकारता येत नाही. अमली पदार्थांच्या या जाळ्यामागील मुख्य सूत्रधारांचा शोध घेण्यासाठी तपास अधिक तीव्र करण्यात आला आहे.

