तुमसर : राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा अधोरेखित केली आहे. त्याचा लाभ कृषिप्रधान जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भंडारा येथील शेतकऱ्यांना व्हावा या करीता डिस्ट्रिक्ट सेंट्रल को ऑपरेटिव्ह बँकेचे उपाध्यक्ष प्रदीप पडोळे ॲक्शन मोडवर आले आहेत. सध्या पडोळे यांनी तुमसर मोहाडी क्षेत्रातील सर्व सहकारी बँक शाखेत व्यक्तिशः भेट देऊन अधिकारी कर्मचारी यांना त्याबाबत सज्ज राहण्याच्या सूचना केल्या. तसेच शाखेत येणाऱ्या प्रत्येक शेतकरी खातेधारकांशी आपुलकीचे बंध जोपासण्याची ताकीद दिली आहे. राज्य शासनाच्या तरतुदींना आणि त्या अनुषंगाने पाळल्या जाणाऱ्या नियमांची आणि कागदपत्रांची जुळवाजुळव करण्याकरिता लाभार्थी शेतकऱ्यांना सहकार्य करण्याच्या सूचना त्यावेळी पडोळे यांनी दिल्या. येत्या दिवसात सादर होणाऱ्या अर्थ संकल्पात सदर घोषणेची अंमलबजावणी केली जाणार असून त्या करीता सहकारी बँकांनी सज्ज राहण्याच्या विशेष सूचना देखील देण्यात आल्या. बँकेचे उपाध्यक्ष म्हणून राज्याचे कर्जधोरण, वसुली, ठेवी वाढ, आर्थिक शिस्त याबाबत संविधानिक अधिकार असलेल्या पडोळे यांनी क्षेत्रातील शेतकऱ्यांना या माध्यमातून पारदर्शकतेचा संदेश दिला आहे.
बळीराजाला समजून घेण्याची गरज
महायुती सरकार राज्यातील शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी आहे. त्याकरिता यंत्रणा सर्वोपरी तयार राहून कार्य करत आली आहे. त्यामुळे ह्या कर्जमाफी दरम्यान बँकेचे निरीक्षक आणि तत्सम अधिकाऱ्यांवर महत्त्वाची जबाबदारी असते. येथे अनेक संकटांचा सामना करून आपल्या हक्काची मागणी सादर करणाऱ्या प्रत्येक बळीराजाला शाखेने समजून घेण्याची गरज त्यावेळी पडोळे यांनी व्यक्त केली आहे.

