पुणे/मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांनी महाराष्ट्राच्या राजकारणाचं चित्र स्पष्ट केलं आहे. २१ महानगरपालिकांवर महायुतीने निर्विवाद वर्चस्व मिळवलं असताना, काही पक्षांसाठी हा निकाल आत्मपरीक्षणाचा ठरला आहे. याच पार्श्वभूमीवर अजित पवार गटाला महापालिका निवडणुकीत मोठं अपयश पत्करावं लागलं असून, या पराभवाचे पडसाद आता थेट राज्याच्या राजकारणात उमटताना दिसत आहेत.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकांमध्ये सत्ता मिळवण्यासाठी अजित पवारांनी अखेरपर्यंत आक्रमक रणनीती अवलंबली होती. शरद पवार गटासोबत केलेली युती, सातत्याने झालेल्या बैठका आणि जोरदार प्रचारानंतरही अपेक्षित यश हाती आलं नाही. या दोन्ही महापालिकांतील निकालांनी अजित पवार गटाची ताकद मर्यादित असल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे.
निकाल जाहीर झाल्यानंतर अजित पवार यांनी माध्यमांपासून अंतर ठेवत मौन बाळगलं. कोणतीही प्रतिक्रिया न देता ते निघून गेल्याने त्यांच्या मनात सुरू असलेली अस्वस्थता स्पष्टपणे जाणवत होती. पराभव केवळ आकड्यांचा नव्हता, तर तो राजकीय प्रतिष्ठेलाही लागलेला धक्का असल्याचं बोललं जात आहे.दरम्यान, महापालिकेच्या निकालानंतर अवघ्या काही तासांतच अजित पवारांनी बारामतीचा मार्ग धरला. गोविंद बागेत शरद पवारांची भेट घेण्याचा त्यांचा कार्यक्रम ठरल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या भेटीसाठी शरद पवार गटाचे माजी आमदार राजेश टोपेही उपस्थित असल्याची माहिती आहे.
ही भेट नेमकी कशासाठी, याबाबत तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. काहींच्या मते, येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रणनीती ठरवण्यासाठी ही चर्चा होत आहे. तर काही राजकीय जाणकारांच्या मते, महापालिकेतील पराभवानंतर अजित पवार राज्याच्या राजकारणात एखादा निर्णायक पाऊल उचलू शकतात.सध्या पवार काका–पुतण्यांची ही भेट पूर्णपणे गुप्त ठेवण्यात आली असली, तरी या भेटीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात नवे समीकरण आकाराला येणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

