नागपूर - इंग्रजी नववर्ष २०२६ची सुरुवात होताच ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने अनेक महत्त्वाचे आणि दुर्मिळ योग जुळून आले आहेत. नवग्रहांपैकी गुरू, शनि, राहू-केतू हे ग्रह अत्यंत प्रभावशाली मानले जातात. त्यांचे गोचर केवळ व्यक्तीच्या आयुष्यावरच नव्हे, तर समाज, देश आणि जगावरही परिणाम घडवते, असे मानले जाते.
सध्या नवग्रहांचा न्यायाधीश मानला जाणारा शनि ग्रह मीन राशीत विराजमान आहे. मीन ही गुरूची रास असून, २९ मार्च २०२५ रोजी शनीने या राशीत प्रवेश केला. विशेष म्हणजे संपूर्ण २०२६ हे वर्ष शनि मीन राशीतच राहणार आहे. शनीचा वेग अत्यंत मंद असतो, पण त्याचा प्रभाव दीर्घकालीन आणि खोलवर परिणाम करणारा असतो. एका राशीत तो साधारण अडीच वर्षे वास्तव्यास असतो.
साडेसाती म्हणजे नेमकं काय?
साडेसाती हा शब्द ऐकला की अनेकांच्या मनात भीती निर्माण होते. साडेसाती म्हणजे संकट, अडचणी, त्रास अशी नकारात्मक प्रतिमा समाजात रूढ झालेली आहे. मात्र ज्योतिषशास्त्रानुसार साडेसाती हा काळ केवळ त्रासदायक नसून, तो जीवनातील शुद्धिकरणाचा आणि आत्मपरीक्षणाचा काळ मानला जातो. शनि हा कर्मकारक ग्रह असल्याने व्यक्तीच्या पूर्वकर्मांनुसार तो फळ देतो, असे मानले जाते.
सध्या कोणत्या राशींवर साडेसाती?
सध्या कुंभ, मीन आणि मेष या तीन राशींवर शनीची साडेसाती सुरू आहे. ही स्थिती जून २०२७ पर्यंत कायम राहणार आहे. जून २०२७ मध्ये शनी मेष राशीत प्रवेश केल्यानंतर कुंभ राशीची साडेसाती संपेल आणि वृषभ राशीची साडेसाती सुरू होईल.
याशिवाय सिंह आणि धनू या राशींवर शनीचा ढैय्या (अडीचकी) प्रभाव आहे. हा प्रभाव देखील जून २०२७ पर्यंत राहणार आहे. त्यामुळे २०२६ या संपूर्ण वर्षात साडेसाती आणि ढैय्या यामध्ये कोणताही बदल होणार नाही.
साडेसातीच्या काळात काय करावे?
ज्योतिषतज्ज्ञांच्या मते, साडेसातीच्या काळात घाबरण्याचे कारण नाही. उलट या काळात प्रामाणिकपणे, संयमाने आणि निष्ठेने काम केल्यास शनीचा आशीर्वाद मिळतो. चांगली कर्मे केली, तर शनि त्रास देत नाही, तर योग्य मार्गावर नेतो.ज्यांच्या आयुष्यात साडेसाती किंवा ढैय्या प्रभाव सुरू आहे, त्यांनी २०२६ मध्ये काही महत्त्वाचे उपाय नियमितपणे करावेत, असे सांगितले जाते.
शनीची कृपा मिळवण्यासाठी उपाय-
दररोज आपल्या इष्टदेवतेचा जप करावा.
शक्य असल्यास महादेवांची उपासना, नामस्मरण आणि मंत्रजप करावा.
शनिवारी गरजू लोकांना अन्नधान्य किंवा आवश्यक वस्तू दान करावे.
शनिवारी शनीदेवाच्या मंदिरात जाऊन काळे तीळ अर्पण करावेत आणि तेलाचा दिवा लावावा.
शनी चालीसा, शनी स्तोत्र किंवा शनी मंत्रांचे पठण करावे.
हनुमानाची उपासना करणे विशेष लाभदायक मानले जाते. हनुमान चालीसा, बजरंगबाण, सुंदरकांड किंवा मारुती स्तोत्र म्हणावे.
दर शनिवारी पिंपळाच्या झाडाला पाणी व दूध अर्पण करून दिवा लावावा.
सकारात्मक दृष्टीकोन महत्त्वाचा-
साडेसाती हा काळ शिक्षा देण्यासाठी नसून, जीवनाला योग्य दिशा देण्यासाठी असतो, असे मानले जाते. संयम, शिस्त आणि प्रामाणिकपणा हे गुण अंगीकारल्यास शनी त्रास देत नाही, तर आयुष्यात स्थैर्य आणि यश देतो. त्यामुळे २०२६ या वर्षात निराश न होता, आपल्या कर्मांवर विश्वास ठेवून पुढे वाटचाल करणेच शनीची खरी उपासना ठरेल.

