मुंबई:राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलीनीकरणाबाबत पुन्हा एकदा चर्चा रंगू लागली असून, पक्षाचे ज्येष्ठ नेते सुनील तटकरे यांच्या ताज्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढली आहे. येत्या १० फेब्रुवारी रोजी होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीदरम्यान या विषयावर चर्चा होण्याचे संकेत तटकरे यांनी दिले आहेत.
पत्रकारांशी संवाद साधताना सुनील तटकरे म्हणाले की, “आम्ही सर्वांनी मिळून अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता. विलीनीकरणासारखा विषय सखोल चर्चेनंतरच ठरवला जाईल.” १० फेब्रुवारीच्या मंत्रिमंडळ बैठकीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित असतील, त्यावेळी त्यांच्यासोबत विलीनीकरणाबाबत चर्चा केली जाऊ शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
तटकरे पुढे म्हणाले की, सुनेत्रा पवार दिल्ली दौर्यावर जाण्याचीही शक्यता असून, त्या दरम्यान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट होऊ शकते. “योग्य वेळ आल्यावर सर्व संबंधित नेते एकत्र बसून विलीनीकरणावर चर्चा करतील,” असे संकेत त्यांनी दिले.
दरम्यान, दोन्ही राष्ट्रवादी गटांमध्ये या मुद्द्यावर मतभेद असल्याचेही स्पष्ट होत आहे. अजित पवार गटातील काही नेत्यांनी विलीनीकरणास अनुकूल नसल्याची भूमिका अप्रत्यक्षपणे मांडली आहे. तर शरद पवार गटातील नेते अजित पवार यांची विलीनीकरणाबाबत सकारात्मक भूमिका होती, असा दावा करत आहेत. त्यामुळे येत्या काळात या विषयावर काय निर्णय होतो, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

