हिवाळ्यात ‘या 5 गोष्टी’ ठेवा कायम लक्षात
नवी दिल्ली :कडाक्याच्या थंडीत गरमागरम चहा, भजी आणि रजईतील ऊब यांचा आनंद घेत असतानाच शरीराच्या आत एक ‘सायलंट’ बदल घडत असतो. हाच बदल अनेक वेळा अचानक ब्लड प्रेशर (BP) वाढण्यास आणि हार्ट अटॅक किंवा स्ट्रोकसारख्या गंभीर घटनांना कारणीभूत ठरतो. सध्या उत्तर भारतातील काही भागांत तापमान शून्याच्या आसपास पोहोचले असून, त्याचवेळी हार्ट अटॅक आणि स्ट्रोकच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ दिसून येत आहे.
या पार्श्वभूमीवर AIIMS, नवी दिल्ली येथील हृदयविकार विभागाचे प्रमुख डॉ. राजीव नारंग यांनी हिवाळ्यात हृदयाची विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. थंडीचा शरीरावर नेमका काय परिणाम होतो आणि कोणत्या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास धोका वाढू शकतो, याबाबत त्यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
थंडीत बीपी अचानक का वाढतो?
डॉ. नारंग यांच्या मते, थंडीमुळे शरीरातील रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. वैद्यकीय भाषेत या प्रक्रियेला ‘वासोकन्स्ट्रिक्शन’ म्हणतात. रक्तवाहिन्या आकुंचन पावल्याने रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होतो आणि हृदयाला अधिक जोर लावून रक्त पंप करावे लागते. परिणामी रक्तदाब अचानक वाढतो आणि हार्ट अटॅकचा धोका वाढतो.
ही लक्षणे दिसली तर दुर्लक्ष करू नका
चालताना किंवा थोडा व्यायाम करताना अचानक धाप लागणे
छातीत जडपणा, कळ किंवा ‘एंजाइना’सारखी लक्षणे
नियमित औषधे घेत असूनही बीपीचे रीडिंग वाढणे
हिवाळ्यात हृदय सुरक्षित ठेवण्यासाठी AIIMS डॉक्टरांचे 5 ‘गोल्डन रूल्स’
1) नियमित बीपी तपासणी
औषधे सुरू आहेत म्हणजे बीपी नियंत्रणातच असेल, असा गैरसमज करू नका. कडाक्याच्या थंडीत बीपी वाढू शकतो. घरच्या घरी बीपी मशीन ठेवा. 140/90 mmHg पेक्षा जास्त रीडिंग आल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या.
2) मिठाच्या वापरावर नियंत्रण ठेवा
हिवाळ्यात तिखट, चमचमीत आणि तळलेले पदार्थ जास्त खाल्ले जातात. या पदार्थांमधील मीठ बीपी वाढवते. त्यामुळे जेवणातील मिठाचे प्रमाण मर्यादित ठेवा.
3) तहान नसली तरी पाणी प्या
थंडीत तहान कमी लागते, त्यामुळे पाणी पिणे कमी होते. मात्र यामुळे डिहायड्रेशन होऊन बीपी वाढू शकतो. हिवाळ्यातही पुरेसे पाणी पिणे अत्यंत आवश्यक आहे.
4) प्रोसेस्ड आणि थंड अन्न टाळा
पॅकेज्ड, प्रोसेस्ड आणि थंड अन्न हृदयासाठी घातक ठरू शकते. शक्यतो कोमट, ताजे आणि सुपाच्य अन्न घ्या. आठवड्यातून एखाद-दोन वेळा खिचडीसारखे साधे पदार्थ हृदयासाठी फायदेशीर ठरतात.
5) अधिक सतर्क राहा
ज्येष्ठ नागरिक, आधीपासून हृदयविकार असलेले रुग्ण आणि हाय बीपीच्या रुग्णांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. केवळ औषधांवर अवलंबून न राहता आहार, पाणी पिण्याच्या सवयी आणि जीवनशैलीत बदल करा.
थंडीचा आनंद घ्या, पण हृदयाकडे दुर्लक्ष नको.
AIIMSच्या डॉक्टरांनी सांगितलेले हे छोटे बदल वेळेत अंगीकारल्यास हिवाळ्यातील हार्ट अटॅक आणि स्ट्रोकसारख्या मोठ्या धोक्यांपासून स्वतःचे संरक्षण करता येईल.

