मुंबई : भारतीय क्रिकेटसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. अनुभवी फलंदाज विराट कोहलीने आयसीसीच्या ताज्या वनडे फलंदाजी क्रमवारीत पुन्हा एकदा पहिलं स्थान मिळवत आपलं वर्चस्व सिद्ध केलं आहे.
सहकारी रोहित शर्माला मागे टाकत विराटने अव्वल स्थानावर झेप घेतली असून जवळपास पावणे पाच वर्षांनंतर तो पुन्हा ‘नंबर वन’ ठरला आहे.न्यूझीलंडविरुद्ध बडोद्यात झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात विराटने खेळलेली 93 धावांची दमदार खेळी त्याच्यासाठी निर्णायक ठरली. गेल्या पाच एकदिवसीय डावांमध्ये सातत्याने 50 पेक्षा अधिक धावा करणाऱ्या विराटला या कामगिरीचा मोठा फायदा रँकिंगमध्ये झाला. परिणामी, रोहित शर्माला अव्वल स्थान गमवावे लागले असून तो थेट तिसऱ्या क्रमांकावर घसरला आहे.विराट कोहलीने तब्बल 4 वर्षे 9 महिने आणि 1,736 दिवसांनंतर वनडे क्रिकेटमधील पहिलं स्थान पटकावलं आहे. याआधी 13 एप्रिल 2021 रोजी तो अव्वल स्थानी होता. मात्र त्यानंतर पाकिस्तानच्या बाबर आझमने त्याला मागे टाकलं होतं.
आता पुन्हा एकदा विराटने आपली बादशाही प्रस्थापित केली आहे.गेल्या काही महिन्यांपासून विराटचा एकदिवसीय क्रिकेटमधील फॉर्म जबरदस्त राहिला आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत त्याने दोन शतकं आणि एक अर्धशतक झळकावलं होतं. न्यूझीलंडविरुद्धही हीच लय कायम ठेवत त्याने मोठी धावसंख्या उभारली आणि क्रमवारीत अव्वल स्थानावर झेप घेतली.आयसीसीच्या ताज्या आकडेवारीनुसार विराटच्या खात्यात 785 रेटिंग पॉइंट्स आहेत. न्यूझीलंडचा डॅरेल मिचेल 784 गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. रोहित शर्माकडे 775 रेटिंग पॉइंट्स असून तो तिसऱ्या स्थानावर आहे. विशेष म्हणजे टॉप 10 फलंदाजांमध्ये भारताचे चार खेळाडू असून शुभमन गिल पाचव्या, तर श्रेयस अय्यर दहाव्या स्थानावर आहे.विराटच्या या यशामुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण असून ‘किंग कोहली’ने पुन्हा एकदा आपली गुणवत्ता आणि सातत्य सिद्ध केलं आहे.

