नागपूर : राज्यात बुधवारी रात्री झालेल्या अवकाळी पावसाने अनेक जिल्ह्यांतील पिकांना फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रशासनाला तातडीने पंचनामे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पंचनाम्यांचा सविस्तर अहवाल मिळाल्यानंतर शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.
उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील विविध भागांत शेतीचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अहवालातून स्पष्ट होत आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणांना त्वरित पाहणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुख्यमंत्री स्तरावरूनही या प्रकरणात तत्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती बावनकुळे यांनी दिली.
भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाबाबत बोलताना त्यांनी विरोधकांना इशारा देत, केवळ वक्तव्यांवर न राहता ठोस पुरावे असल्यास ते एसआयटीकडे द्यावेत, असे आवाहन केले. या प्रकरणातील विविध आरोपांची चौकशी विशेष तपास पथक करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, १ जानेवारी २०११ पूर्वी शासकीय जमिनीवर किंवा मंजूर लेआउटमध्ये उभारण्यात आलेल्या घरांना नियमित करण्याचा निर्णयही सरकारने घेतला आहे. यासाठीची मर्यादा पूर्वी ५०० चौरस फूट होती, ती वाढवून आता १,५०० चौरस फूट करण्यात आली आहे. लाभ घेण्यासाठी संबंधित व्यक्ती महाराष्ट्रातील रहिवासी असणे आणि २०११ च्या मतदार यादीत नाव असणे आवश्यक राहील. तसेच, पुढे अनधिकृत बांधकामांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

