मुंबई :मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला असून, या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने दणदणीत विजय मिळवत २५ वर्षांपासून शिवसेना (ठाकरे गट) सत्तेत असलेला बालेकिल्ला उद्ध्वस्त केला आहे. भाजपाला ८९ जागांवर विजय मिळाला असून, शिवसेना ठाकरे गटाला ६५ जागांवर समाधान मानावे लागले आहे.
निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी विजयी उमेदवारांशी संवाद साधत आपली पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली. यावेळी बोलताना त्यांनी भाजपवर जोरदार टीका करताना शिवसेना अजून संपलेली नसल्याचा ठाम दावा केला.“भाजपला वाटत असेल की त्यांनी शिवसेना कागदावर संपवली आहे, पण शिवसेना अजूनही जमिनीवर जिवंत आहे. साम, दाम, दंड, भेद वापरून निवडणूक जिंकता येईल; पण निष्ठा कधीच विकत घेता येत नाही,” असे ठाकरे म्हणाले.
“या निवडणुकीत जे विकले गेले नाहीत, त्यांच्या चरणी मी नतमस्तक आहे. आपली जबाबदारी आता अधिक वाढली आहे. मुंबईत आपलाच महापौर व्हावा, हे माझं स्वप्न आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.पुढे बोलताना त्यांनी शिंदे गटावर गंभीर आरोप केले. “गद्दारी करून मिळवलेला हा विजय मुंबई गिळंकृत ठेवण्यासाठी आहे. त्यांनी जे पाप केलं आहे, ते मराठी माणूस कधीही माफ करणार नाही,” असा हल्लाबोल त्यांनी केला.
“आपल्याकडे पैसा नसेल, पण आपल्याकडे जी ताकद आहे, तिने विरोधकांना घाम फोडला आहे. ही शक्ती एकत्र राहिली पाहिजे, जेणेकरून पुढील पिढीला तुमचा अभिमान वाटेल,” असे आवाहन ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना केले.या निवडणुकीतील यश त्यांनी मराठी जनतेला समर्पित करताना, “ही लढाई आता सुरू झाली आहे. जिद्द मोठी असते. आपण पुन्हा जिंकू. एकत्र आणि मजबुतीने उभे राहा,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

