नागपूर - घरात एखाद्या व्यक्तीला टाईप-1 डायबिटीज असल्यास ही बातमी निश्चितच दिलासादायक ठरणारी आहे. जर्मनीतील शास्त्रज्ञांनी पॅन्क्रियासमधील नव्या पेशी विकसित करत टाईप-1 डायबिटीजच्या मुळावर उपचार करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.टाईप-1 डायबिटीजमध्ये शरीर इन्सुलिन तयार करू शकत नाही. त्यामुळे रुग्णांना आयुष्यभर इन्सुलिन इंजेक्शनवर अवलंबून राहावे लागते. मात्र या नव्या थेरपीनंतर रुग्णांना वारंवार इन्सुलिन घेण्याची गरज भासणार नाही, असा दावा संशोधकांनी केला आहे.
या उपचारानंतर तब्बल १८ महिन्यांनंतरही सुमारे ८२ टक्के रुग्ण पूर्णपणे निरोगी असल्याचे निरीक्षणात आले आहे. विशेष म्हणजे या रुग्णांना कोणत्याही प्रकारच्या औषधांची गरज भासलेली नाही.जर्मनीत विकसित करण्यात आलेली ही अत्याधुनिक थेरपी मानवी शरीरातील इन्सुलिन तयार करण्याची नैसर्गिक प्रक्रिया पुन्हा सक्रिय करते. त्यामुळे जन्मापासूनच इन्सुलिन निर्मिती न होणाऱ्या टाईप-1 रुग्णांसाठी ही मोठी आशेची किरण ठरली आहे.
या संशोधनामुळे टाईप-1 डायबिटीजच्या रुग्णांना सतत रक्तातील साखर तपासण्याच्या मानसिक तणावातूनही मुक्ती मिळणार आहे. परिणामी, रुग्ण अधिक मोकळेपणाने आणि आनंदाने दैनंदिन जीवन जगू शकणार आहेत.सध्या हे तंत्रज्ञान अत्यंत नवीन आणि खर्चिक असल्याने सर्वसामान्य रुग्णांसाठी ते सहज उपलब्ध नाही. मात्र भविष्यात याचा खर्च कमी होण्याची शक्यता असून, त्यामुळे सामान्य नागरिकांनाही या उपचाराचा लाभ घेता येईल.जर्मनीतील हा यशस्वी प्रयोग भविष्यात जगभरातील कोट्यवधी टाईप-1 डायबिटीज रुग्णांसाठी वरदान ठरू शकतो, असा विश्वास तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

