नागपूर : सुयोग नगर चौक, तुकाराम सभागृह परिसर (नरेंद्र नगर) येथे ‘चवदार प्यावू’ या उपक्रमाचे उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. या कार्यक्रमाच्या उद्घाटक म्हणून सौ. विद्या थोरात उपस्थित होत्या. तसेच प्रा. डॉ. हरीश मोहिते, इंजिनियर प्रणव कुरेवार, समाजसेवक पप्पू थोरात, लादुराम कुमावत, श्री वाळके आणि मांडवे हे प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी झाले होते.
यावेळी मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘चवदार तळे’ सत्याग्रहातून दिलेल्या सामाजिक समतेच्या संदेशाचा उल्लेख केला. वंचित समाजाला पाण्याचा मूलभूत हक्क मिळवून देण्यासाठी बाबासाहेबांनी उभारलेला हा लढा भारतीय सामाजिक इतिहासातील महत्त्वाचा टप्पा मानला जातो. या ऐतिहासिक घटनेला यंदा शंभर वर्षे पूर्ण होत असल्याने कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
‘चवदार ग्लोबल ग्रीन गुडनेस ऑर्गनायझेशन इंडिया थ्री’च्या माध्यमातून मागील चार वर्षांपासून हा ‘चवदार प्यावू’ उपक्रम सातत्याने राबवला जात असून, या उपक्रमाचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य मिलिंद वानखेडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रमोद भोयर यांनी व्यक्त केले. या प्रसंगी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

