नागपूर : आपल्या घरात औषधांचा एक छोटासा साठा असणे ही आजकालची सामान्य गोष्ट झाली आहे. डोकेदुखी झाली की लगेच गोळी, अंगदुखी झाली की पेनकिलर किंवा ताप आला की लगेच औषध घेण्याची सवय अनेकांना लागली आहे. मात्र हीच सवय नकळतपणे आपल्या आरोग्यासाठी धोकादायक ठरत असल्याचा गंभीर इशारा आरोग्यतज्ज्ञांनी दिला आहे.
अनेक वेळा डॉक्टरांनी आधी दिलेली औषधे पूर्ण न करता उरलेली गोळ्या आपण जपून ठेवतो. पुढे पुन्हा तशाच प्रकारची लक्षणे दिसली की, डॉक्टरांचा सल्ला न घेता त्याच औषधांचा वापर करतो. पण तज्ज्ञांच्या मते, वरकरणी लक्षणे सारखी वाटली तरी आजाराचे कारण वेगळे असू शकते. अशा वेळी स्वतःहून औषधे घेणे म्हणजे शरीरावर धोका ओढवून घेणे होय.
विशेषतः वेदनाशामक औषधांचा (पेनकिलर्स) सतत वापर केल्याने किडनीवर गंभीर परिणाम होऊ शकतो. तसेच अनेक औषधे लिव्हरमध्ये प्रक्रिया होतात. त्यांचा अतिरेक झाल्यास लिव्हरला सूज येणे किंवा कार्यक्षमता कमी होण्याचा धोका वाढतो.
सर्दी-खोकल्यासारख्या किरकोळ त्रासासाठीही अँटीबायोटिक्स घेण्याची चुकीची सवय अनेकांमध्ये दिसते. यामुळे शरीर त्या औषधांना प्रतिसाद देणे थांबवते. परिणामी, भविष्यात मोठ्या आजारांवर उपचार करताना औषधे प्रभावी ठरत नाहीत.
याशिवाय, काही औषधांना शरीरात तीव्र प्रतिक्रिया होऊ शकते. श्वास घेण्यास त्रास, अचानक रक्तदाब कमी होणे यासारखे गंभीर परिणामही संभवतात. सर्वात धोकादायक बाब म्हणजे औषधांमुळे मूळ आजाराची लक्षणे तात्पुरती दडपली जातात. त्यामुळे कॅन्सर किंवा हृदयविकारासारखे गंभीर आजार वेळेवर लक्षात येत नाहीत.
औषधांची मुदत तपासणेही तितकेच महत्त्वाचे आहे. एक्सपायरी डेट निघालेली औषधे शरीरासाठी हानिकारक ठरू शकतात. तसेच औषधे योग्य ठिकाणी साठवली नाहीत, तर त्यांच्या गुणधर्मात बदल होऊ शकतो.
म्हणूनच, कोणतेही औषध घेण्यापूर्वी किमान आपल्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे. थोडी काळजी घेतल्यास मोठ्या धोक्यांपासून स्वतःचे संरक्षण करता येऊ शकते.

