नागपूर : राज्यातील पोलिस भरतीला लवकरच सुरुवात होणार असून, १६ फेब्रुवारीपासून मैदानी आणि शारीरिक चाचण्या घेण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने आवश्यक तयारी पूर्ण केली आहे.पुणे शहर पोलिस दलासाठी ६३३ पदांवर भरती केली जाणार असून, यासाठी सुमारे ३९ हजार उमेदवारांनी अर्ज केले आहेत. उमेदवारांची संख्या मोठी असल्याने भरती प्रक्रिया सुरळीत आणि पारदर्शक राहावी यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे.
शारीरिक चाचण्या पोलिस मुख्यालय तसेच राज्य राखीव पोलिस दलाच्या गट क्रमांक दोनच्या मैदानावर पार पडणार आहेत.या भरतीत पोलिस अंमलदार, वाहनचालक आणि पोलिस बँडसमन अशा विविध पदांचा समावेश असून, राज्यभरात एकूण १६३३ पदे भरली जाणार आहेत. मैदानी चाचणीनंतर पात्र उमेदवारांसाठी लेखी परीक्षा आयोजित केली जाणार आहे.
निवड प्रक्रिया कशी असेल?
उमेदवारांची निवड शारीरिक चाचणी व लेखी परीक्षेच्या माध्यमातून केली जाणार आहे. शारीरिक तपासणीत उंची आणि छातीची मोजणी करण्यात येणार आहे.
त्यानंतर
१०० मीटर धावणे,
१६०० मीटर धावणे (महिलांसाठी ८०० मीटर),
गोळाफेक
अशा चाचण्या घेतल्या जातील. शारीरिक चाचणीसाठी एकूण १०० गुण ठेवण्यात आले असून, किमान ५० गुण मिळवणे आवश्यक आहे.
भरती प्रक्रियेत कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी आरएफआयडी प्रणाली आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे संपूर्ण प्रक्रियेवर नजर ठेवली जाणार आहे. यामुळे उमेदवारांची उपस्थिती आणि वेळेची अचूक नोंद घेतली जाणार आहे.

