नाशिक : शिर्डी परिसरात जमीन खरेदी आणि बनावट बँक खाती उघडल्याच्या आरोपांमुळे चर्चेत आलेल्या तथाकथित मांत्रिक अशोक खरात प्रकरणाला आता अधिकच वेग आला आहे. या प्रकरणातील तपास करत असलेल्या एसआयटीने खरात यांच्या आर्थिक व्यवहारांशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रे आणि बँक खात्यांची माहिती अंमलबजावणी संचालनालयाकडे (ED) सुपूर्द केली आहे. मनी लाँड्रिंगच्या शक्यतेने ईडीनेही स्वतंत्र तपास सुरू केला आहे.
या प्रकरणात कल्पना खरात यांच्यासह एकूण पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी मुख्य आरोपी अशोक खरात यांच्या अटकेसाठी न्यायालयात अर्ज सादर केला असून, आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
दरम्यान, दुसऱ्या एका लैंगिक अत्याचार प्रकरणात न्यायालयाने अशोक खरात यांना २१ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात २०२० पासून धार्मिक विधींच्या नावाखाली एका महिलेवर वारंवार अत्याचार केल्याचा गंभीर आरोप आहे. तिसऱ्या प्रकरणातही कोठडी मिळावी यासाठी एसआयटीने स्वतंत्र अर्ज दाखल केला आहे.
सुरक्षेच्या कारणास्तव, मागील सुनावणीदरम्यान खरात यांना प्रत्यक्ष न्यायालयात न आणता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावत नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात हलवण्याचे आदेश दिले आहेत.
नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात ३५ वर्षीय महिलेने तक्रार दाखल केल्यानंतर १७ मार्च रोजी खरात यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता (BNS 2023) तसेच महाराष्ट्रातील अंधश्रद्धा व काळी जादू प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
तक्रारीनुसार, पीडित महिला २०१३ पासून खरात यांच्या संपर्कात होती. विवाह जुळवून देण्याच्या बहाण्याने ओळख झाल्यानंतर त्यांनी तिच्याशी संपर्क कायम ठेवला. पुढे कौटुंबिक समस्या सोडवण्याचे आमिष दाखवत तिचे वारंवार लैंगिक शोषण करण्यात आले. एका टप्प्यावर ती गर्भवती झाल्यानंतर तिला जबरदस्तीने गर्भपात करण्यास भाग पाडल्याचाही आरोप आहे.
या सर्व घडामोडींमुळे प्रकरणाची व्याप्ती वाढली असून, आर्थिक गैरव्यवहार, फसवणूक आणि लैंगिक अत्याचार अशा अनेक गंभीर गुन्ह्यांचा तपास एकाच वेळी सुरू आहे. एसआयटी आणि ईडीच्या संयुक्त कारवाईमुळे पुढील काही दिवसांत या प्रकरणात आणखी धक्कादायक उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

