मुंबई : मुंबईतील नेस्को येथे आयोजित रेव्ह पार्टी प्रकरण अधिकच गंभीर बनले असून, अमली पदार्थांच्या अतिसेवनामुळे दोन एमबीए विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी सिद्धी सावंत (३१) या महिलेला अटक केली असून, ती ड्रग्ज पुरवठादार प्रतीक पांडेची लिव्ह-इन पार्टनर असल्याची माहिती समोर आली आहे.
तपासादरम्यान, सिद्धी सावंत ही या संपूर्ण ड्रग्ज रॅकेटच्या आर्थिक व्यवहारांची जबाबदारी सांभाळत असल्याचे उघड झाले आहे. दरम्यान, या प्रकरणातील मुख्य सूत्रधार अटकेच्या भीतीने देशाबाहेर पळून गेला असून, तो दुबई किंवा इतर आखाती देशात लपल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्याच्या विरोधात लुकआऊट सर्क्युलर जारी करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
११ एप्रिल २०२६ रोजी पार पडलेल्या या संगीत कार्यक्रमात सुमारे ४ हजार जणांची उपस्थिती होती. कडक सुरक्षा व्यवस्था असतानाही अमली पदार्थ कार्यक्रमस्थळी कसे पोहोचले, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी आयोजक आणि सुरक्षा यंत्रणांच्या भूमिकेचाही तपास सुरू केला आहे.
या प्रकरणाची व्याप्ती वाढवत पोलिस ड्रग्ज पुरवठा साखळीच्या मुळापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच, या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का आणि यापूर्वी अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत का, याचाही सखोल तपास सुरू आहे.

