मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीनंतर महापौरपदाची चर्चा सुरू असतानाच काँग्रेस पक्षात मात्र अस्वस्थतेचं वातावरण निर्माण झालं आहे. भाजप–शिवसेना युतीने मुंबईत सत्ता मिळवत राजकीय समीकरणे बदलली असताना, काँग्रेसला या लढतीत चौथ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं आहे. मिळालेल्या जागांवरूनच पक्षातील मतभेद उघडपणे समोर येत असल्याने काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर आला आहे.
या निवडणुकीत काँग्रेसने २४ जागा मिळवत अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली असली, तरी त्यावर समाधान व्यक्त करण्याऐवजी पक्षात नेतृत्वावरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. महायुती आणि ठाकरे गटाच्या प्रभावाखाली काँग्रेसची कामगिरी मर्यादित राहील, अशी भीती व्यक्त होत होती. मात्र निकालानंतरही पक्षात एकवाक्यता दिसून आलेली नाही.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानपरिषदेचे आमदार भाई जगताप यांनी थेट मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. अपेक्षित यश न मिळण्यास नेतृत्वाची भूमिका कारणीभूत असल्याचा आरोप करत त्यांनी गायकवाड यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. प्रभावी रणनीतीचा अभाव, संघटनात्मक कमजोरी आणि अपुरं नियोजन यामुळे मुंबईत काँग्रेसची ताकद घटल्याचा दावा त्यांनी केला आहे.
मागील महापालिका निवडणुकीत काँग्रेसला ३१ जागा मिळाल्या होत्या, मात्र यंदा ही संख्या २४ वर आली आहे. या घसरणीमुळे नेतृत्वातील त्रुटी स्पष्ट होत असल्याचं जगताप यांनी नमूद केलं आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे काँग्रेसमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, पक्षातील अंतर्गत संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.
भाई जगताप हे मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष असल्यामुळे त्यांच्या विधानाकडे गांभीर्याने पाहिलं जात आहे. गेल्या काही वर्षांत अनेक माजी नगरसेवकांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजप आणि शिंदे गटाची वाट धरल्याने पक्ष आधीच अडचणीत होता. वंचित बहुजन आघाडीच्या सहकार्यामुळे पक्ष पुन्हा उभारी घेईल, अशी अपेक्षा होती. मात्र निकालानंतर व्यक्त झालेल्या नाराजीमुळे ती अपेक्षा पूर्ण झालेली नसल्याचं स्पष्ट झालं आहे.मुंबई महापालिकेच्या निकालानंतर काँग्रेसमध्ये सुरू झालेल्या या अंतर्गत वादामुळे पुढील राजकीय वाटचाल काय असेल, वर्षा गायकवाड नेतृत्व कायम राहणार की बदल घडणार, याकडे राज्यभरात लक्ष लागून आहे.

