आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत मानसिक ताण आणि थकवा ही जणू रोजचीच समस्या बनली आहे. मात्र अनेकदा या मानसिक थकव्याकडे दुर्लक्ष केले जाते. खरे तर मनावरचा ताण वाढला की शरीर विविध संकेत देऊ लागते. हे संकेत वेळीच ओळखले नाहीत, तर मानसिक आरोग्यासोबतच शारीरिक आरोग्यालाही गंभीर धोका निर्माण
होऊ शकतो. आयुर्वेदात मन आणि शरीर यांचा अतूट संबंध स्पष्टपणे मांडण्यात आला आहे.
आयुर्वेदानुसार मानवी शरीर वात, पित्त आणि कफ या तीन दोषांनी बनलेले आहे, तर मन सत्व, रज आणि तम या तीन गुणांवर आधारित आहे. या दोषांमध्ये आणि गुणांमध्ये असंतुलन निर्माण झाले की त्याचा थेट परिणाम शरीरावर होतो. म्हणजेच मनातील बदल शरीराच्या आरोग्यावर प्रभाव टाकतात.मानसिक ताण, भीती आणि चिंता वाढल्यास वात दोष बळावतो. यामुळे झोप न लागणे, सांधेदुखी, स्नायूंमध्ये जडपणा आणि अस्वस्थता जाणवते. राग, तणाव आणि चिडचिड यामुळे पित्त दोष वाढतो, ज्याचा परिणाम आम्लता, डोकेदुखी, उच्च रक्तदाब आणि त्वचेच्या समस्यांमध्ये दिसून येतो. तर सतत दुःख, निराशा आणि आळसामुळे कफ दोष वाढतो, परिणामी वजन वाढणे, पचन बिघडणे आणि शरीरावर जडपणा येतो.
आयुर्वेदात असेही सांगितले आहे की राग, चिंता किंवा दुःखाच्या अवस्थेत जेवण केल्यास जठराग्नी मंदावतो. अशा वेळी पौष्टिक अन्न घेतले तरी त्याचे नीट पचन होत नाही आणि त्यातून ‘आम’ नावाचा विषारी घटक तयार होतो. हाच ‘आम’ पुढे जाऊन विविध शारीरिक आजारांना कारणीभूत ठरतो.सततच्या कामाच्या तणावामुळे मनातील सत्व गुण कमी होतो आणि तम गुण वाढतो. तम गुण वाढल्यावर शरीर जड वाटणे, सकाळी उठण्याची इच्छा न होणे, डोळ्यांवर झापड येणे असे संकेत दिसू लागतात.
मन आणि शरीर संतुलित ठेवण्यासाठी आयुर्वेदात काही सोपे आणि प्रभावी उपाय सुचवण्यात आले आहेत. सकाळी लवकर उठून सूर्यप्रकाशात थोडा वेळ चालणे, दिवसाची सुरुवात ५ ते १० मिनिटे ध्यानाने करणे यामुळे ताण कमी होतो. दररोज १० ते १५ मिनिटे तीळ किंवा नारळाच्या तेलाने डोके आणि पायांची मालिश केल्यास मज्जासंस्था शांत होते. तसेच मसालेदार, तळलेले आणि कॅफिनयुक्त पदार्थ टाळून डाळी, भाज्या, तूप आणि दूध यांसारखे हलके व उबदार आहार घेतल्यास मन शांत राहण्यास मदत होते.मानसिक थकव्याकडे दुर्लक्ष न करता वेळीच काळजी घेतल्यास अनेक आजारांपासून स्वतःला वाचवता येऊ शकते, असा स्पष्ट संदेश आयुर्वेद देतो.

