नागपूर : शहरात अमली पदार्थांविरोधात पोलिसांनी पुन्हा एकदा कडक कारवाई करत मोठ्या गांजा तस्करीच्या रॅकेटचा भंडाफोड केला आहे. गुन्हे शाखेच्या युनिट ३ ने ‘ऑपरेशन थंडर’ अंतर्गत जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत छापा टाकत ८५ किलो गांजा जप्त केला.
ही कारवाई निर्मल कॉलनी परिसरात उशिरा रात्री गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आली. पोलिसांनी सापळा रचत दोन आरोपींना अटक केली, तर एक जण घटनास्थळावरून पसार झाला असून त्याचा शोध सुरू आहे.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये फिरोज खान सरदार खान (मानकापूर) आणि मोहम्मद शकील मोहम्मद भूरू (यशोधरानगर) यांचा समावेश आहे. फरार आरोपी हरपितसिंग उर्फ ‘हॅप्पी’ याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथक तैनात केले आहे.
घरझडतीदरम्यान पोलिसांच्या हाती मोठा मुद्देमाल लागला. यात ८५ किलो गांजा, तीन मोबाईल फोन, वजन मोजण्याचा काटा आणि तीन चारचाकी वाहने जप्त करण्यात आली. जप्त मालाची किंमत सुमारे ४८ लाख ७० हजार रुपये असल्याचे सांगितले जात आहे.
या प्रकरणी अमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास जरीपटका पोलिसांकडून सुरू आहे.

