नवी दिल्ली : भारतीय संगीतसृष्टीवर दुःखाचा डोंगर कोसळवणारी बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांचे वयाच्या ९२व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाची माहिती सुपुत्र आनंद भोसले यांनी दिली असून, त्यांच्या जाण्याने संपूर्ण चित्रपटसृष्टी आणि संगीतविश्व शोकमग्न झाले आहे.
आशा भोसले यांनी आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत असंख्य गाणी सादर करत रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. त्यांच्या स्वरातील गोडवा, विविधता आणि भावपूर्ण सादरीकरणामुळे त्यांनी प्रत्येक प्रकारच्या संगीतामध्ये वेगळी ओळख निर्माण केली. गझल, शास्त्रीय, भावगीत तसेच लोकप्रिय संगीत अशा विविध शैलींमध्ये त्यांनी आपल्या कलेचा ठसा उमटवला होता.
कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, आशा भोसले यांच्यावर १२ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता शिवाजी पार्क येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या अखेरच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने चाहते तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आशा भोसले यांच्या निधनानंतर समाजमाध्यमांवरून चाहत्यांसह अनेक नामवंत कलावंतांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. भारतीय संगीतविश्वातील त्यांचे योगदान अमूल्य असल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत असून, त्यांच्या आठवणी कायमस्वरूपी जपल्या जातील.

