नागपूर : एसबीएल एनर्जी कंपनीतील भीषण स्फोटानंतर प्रशासनाने हालचाली वेगात केल्या असून सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता विभागीय आयुक्त कार्यालयात महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत दुर्घटनेचा आढावा, नुकसानभरपाईचा निर्णय आणि पुढील कारवाई यावर सविस्तर चर्चा होणार आहे.
बैठकीला पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे , राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्यासह जिल्हाधिकारी उपस्थित राहणार आहेत. तसेच स्फोटाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा नियमांचे परीक्षण करण्यासाठी Petroleum and Explosives Safety Organisation (PESO) चे अधिकारीही बैठकीत सहभागी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान, स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या सर्व १७ कामगारांच्या मृतदेहांबाबत महत्त्वाचा निर्णय सोमवारी होण्याची शक्यता आहे. नुकसानभरपाईच्या निर्णयानंतरच मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले जाणार असल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
या स्फोटाची माहिती समजताच पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सकाळी जिल्हा प्रशासनाला तातडीने सर्वतोपरी मदत कार्य करण्याचे व जखमींवर तातडीने औषधोपचार सुविधा पुरविण्याचे निर्देश दिले होते. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, एनडीआरएफ यांची टिम, वैद्यकीय पथक सकाळीच घटनास्थळी दाखल झाले होते. जखमींना तातडीने ऑरेंजसिटी हॉस्पिटल व इतरत्र उपचारासाठी हलविले. दुपारी त्यांनी स्वत: घटनास्थळी धाव घेवून सर्व घटनेची यांच्याकडून माहिती घेतली. ज्यांचे जीव गेले आहेत, जे जखमी झाले आहेत, त्यांच्या कुटुंबाला जास्तीत जास्त मदत करण्याची शासनाची भूमिका असल्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. संबंधित कंपनीने नियमाप्रमाणे आवश्यक असणाऱ्या सर्व रितसर परवानग्या घेतल्या का, योग्य ती सुरक्षा यंत्रणा होती का याचा कसून तपास केला जात असून कोणालाही यात मोकळे सोडणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड आशिष जैस्वाल त्यांच्यासोबत होते. याचबरोबर खासदार श्यामकुमार बर्वे, आमदार चरणसिंग ठाकूर, माजी आमदार राजू पारवे, मनोहरराव कुंभारे, डॉ. राजीव पोतदार, माजी जि. प. अध्यक्ष सुनीताताई गावंडे, समीर उमप, संदीप सरोदे आदी उपस्थित होते.
भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी सर्व सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन व आवश्यक ती प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येतात का याच्या नियमित तपासण्या संबंधित विभागांनी करायलाच हव्यात. यात ज्यांनी नियमांचे पालन केले नाही अशाविरुध्दही कारवाईचे निर्देश त्यांनी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांना दिले.
या दुर्घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत असून मृतांच्या कुटुंबीयांमध्ये प्रचंड संताप आणि वेदना व्यक्त होत आहेत. प्रशासनाकडून मदतकार्य सुरू असून स्फोटामागील कारणांचा तपास वेगाने केला जात आहे. सोमवारी होणाऱ्या बैठकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.



