चंद्रपूर : जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील मिन्थूर येथील तरुण शेतकरी रोशन कुडे याची अंगावर काटा आणणारी कहाणी समोर आली असून, राज्यातील शेतकऱ्यांची भीषण वास्तवता पुन्हा एकदा उघड झाली आहे. सावकारी कर्जाच्या दलदलीत अडकलेल्या रोशनकडे कर्जफेडीसाठी कोणताही पर्याय उरला नाही. अखेर त्याने जीवघेणा निर्णय घेत थेट कंबोडियात जाऊन आपली किडनी विकली.
कंबोडियातून रोशनसह काही शेतकऱ्यांना व्हिएन्टिन येथे नेण्यात आले. तेथे कॉल सेंटरमध्ये नोकरीचे आमिष दाखवण्यात आले; मात्र वास्तव अत्यंत क्रूर होते. दिवसाचे तब्बल १८ तास काम, कामात कसूर झाली तर अमानुष मारहाण, आणि पगाराचा पत्ताच नाही—अशा परिस्थितीत त्याला डांबून ठेवण्यात आले.
दरम्यान, रोशनच्या कुटुंबीयांनी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची भेट घेतली. प्रकरणाची गंभीरता लक्षात घेत वडेट्टीवार यांनी तत्काळ पोलीस प्रशासन आणि संबंधित देशातील भारतीय दूतावासाशी संपर्क साधत मदतीचा मार्ग मोकळा केला.
रोशनने सावकाराकडून सुरुवातीला केवळ एक लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र अवाजवी व्याजामुळे हे कर्ज तब्बल ५० लाखांपर्यंत पोहोचले. किडनी एक कोटी रुपयांना विकली गेली असली तरी प्रत्यक्षात रोशनच्या हाती फक्त पाच ते सात लाख रुपयेच पडले. या अमानवी छळामुळे तो आत्महत्येच्या विचारांपर्यंत पोहोचला होता. अशा वेळी काँग्रेसने त्याला आधार दिला.
या प्रकरणामागे सावकार आणि अवयव विक्री करणाऱ्या टोळीचे रॅकेट असल्याचा आरोप करत विजय वडेट्टीवार यांनी सखोल चौकशीची मागणी केली आहे. यासाठी विशेष समिती नेमण्याचीही मागणी करण्यात आली आहे.
राज्यातील शेतकरी आज सावकारी आणि बँक कर्जाच्या ओझ्याखाली उद्ध्वस्त होत असल्याचे या घटनेतून स्पष्ट होते. एका शेतकऱ्याला वाचवण्यात यश आले असले, तरी अशी अनेक कुटुंबे आजही संघर्ष करत आहेत. रोशन कुडे यांनी आज माध्यमांसमोर आपली व्यथा मांडत, या व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

