मुंबई : भारतीय संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ व नामवंत गायिका आशा भोसले यांच्या प्रकृतीबाबत चिंताजनक माहिती समोर आली आहे. त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालय येथे दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीविषयी अद्याप कोणतीही अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही.
माहितीनुसार, ११ एप्रिल रोजी त्यांची प्रकृती अचानक खालावली. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. वैद्यकीय तज्ज्ञांनी हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगितले असले तरी त्यांच्या तब्येतीबाबत सविस्तर माहिती अद्याप स्पष्ट करण्यात आलेली नाही.
या घटनेनंतर रुग्णालयाबाहेर वृत्तसंस्थांचे प्रतिनिधी व छायाचित्रकारांची मोठी गर्दी झाली असून चाहत्यांमध्येही चिंता व्यक्त केली जात आहे. कुटुंबीयांकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
सात दशकांहून अधिक काळ संगीत क्षेत्रात कार्यरत असलेल्या आशा भोसले यांनी आपल्या सुरेल आवाजाच्या जोरावर विविध भाषांमध्ये असंख्य गाणी सादर केली आहेत. १९४८ साली ‘सावन आया’ या गाण्याद्वारे त्यांनी आपल्या गायन प्रवासाची सुरुवात केली. आजवर हजारो गाणी गाऊन त्यांनी संगीतविश्वात भक्कम स्थान निर्माण केले असून देशभरासह परदेशातही त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे.

