जळगाव : लग्नाच्या नावाखाली पैशांचा सौदा करत १४ वर्षांच्या अल्पवयीन मुलीचं लग्न लावून दिल्याचा धक्कादायक प्रकार जळगाव जिल्ह्यात उघडकीस आला आहे. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात मुलीचे आई-वडील, बहीण, आत्या, मध्यस्थ महिला, एक तृतीयपंथीय व्यक्ती आणि संबंधित तरुण अशा एकूण सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, लग्नासाठी तब्बल १ लाख ७० हजार रुपये स्वीकारून या अल्पवयीन मुलीचं लग्न लावून देण्यात आलं. विशेष म्हणजे, पहिल्या मुलीच्या लग्नावेळी वराने त्याचा मित्रही वधूच्या शोधात असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर पहिल्या मुलीच्या बहिणीचंही लग्न लावून देण्यात आलं आणि त्यासाठीही १ लाख ७० हजार रुपये घेतल्याचं उघड झालं आहे.
दरम्यान, दुसऱ्या मुलीचं लग्न लावताना ती अल्पवयीन असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर हा प्रकार पोलिसांपर्यंत पोहोचला. संबंधितांनी मुलगी १८ वर्षांची असल्याची खोटी माहिती देत वराची दिशाभूल केल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे.
या प्रकरणात मुलीचं वय तपासून न पाहता तिच्याशी शारीरिक संबंध ठेवल्याच्या आरोपाखाली संबंधित तरुणावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, बालविवाह घडवून आणण्यात सहभागी असलेल्या आई-वडील, बहीण, आत्या, मध्यस्थ महिला आणि तृतीयपंथीय व्यक्तीवर बालविवाह प्रतिबंधक कायद्यासह अन्य संबंधित कलमान्वये गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.या संतापजनक घटनेचा तालुका पोलिसांकडून सखोल तपास सुरू असून, पुढील चौकशीत आणखी गंभीर बाबी समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

