नागपूर : वाढते वय म्हणजे थकलेले शरीर आणि मंदावलेली स्मरणशक्ती, अशी सर्वसाधारण समजूत आहे. मात्र अमेरिकेतील १०१ वर्षीय ज्येष्ठ डॉक्टर डॉ. हॉवर्ड टकर यांनी ही धारणा खोटी ठरवली आहे. एवढ्या वयातही ते सक्रियपणे वैद्यकीय सेवा देत असून त्यांच्या कार्यक्षमतेमागील रहस्य त्यांनी नुकतेच उलगडले आहे.
२०२१ मध्ये ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स’ने त्यांना जगातील सर्वात वयस्कर डॉक्टर म्हणून सन्मानित केले होते. विशेष म्हणजे, शंभरी ओलांडल्यानंतरही ते दररोज ठरलेल्या वेळेत रुग्णांची तपासणी आणि सल्ला देत आहेत. इतकेच नव्हे, तर त्यांनी आयुष्याच्या सहाव्या दशकात कायद्याचे शिक्षण घेऊन नवे क्षेत्रही गाठले.
माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की, मेंदू चपळ ठेवण्यासाठी आणि दीर्घकाळ निरोगी राहण्यासाठी काही साध्या सवयी अंगीकारणे गरजेचे आहे. सतत काहीतरी नवीन शिकत राहणे आणि कामात गुंतलेले राहणे, हे त्यांच्या मते सर्वात महत्त्वाचे आहे. यामुळे मेंदूला सतत चालना मिळते आणि विचारशक्ती तीक्ष्ण राहते.
यासोबतच त्यांनी सामाजिक आयुष्यालाही तितकेच महत्त्व दिले आहे. कुटुंबीय आणि मित्रांशी सातत्याने संपर्क ठेवल्यास मानसिक स्वास्थ्य चांगले राहते. नियमित भेटीगाठी, संवाद आणि एकत्र वेळ घालवणे यामुळे आयुष्यात सकारात्मकता टिकून राहते, असे ते सांगतात.
तसेच, कामाव्यतिरिक्त छंद जोपासणेही आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. विशेषतः पुस्तके वाचणे, नवीन विषय जाणून घेणे यामुळे मेंदू सक्रिय राहतो.
डॉ. टकर यांच्या मते, पूर्णपणे निष्क्रिय होणे किंवा लवकर निवृत्ती घेणे टाळावे. सक्रिय राहणे, नातेसंबंध जपणे आणि सतत शिकत राहणे या तीन सवयी अंगीकारल्यास दीर्घ आणि निरोगी आयुष्य जगणे शक्य आहे.

