मुंबई : राज्यातील महानगरपालिका निवडणुकांचा प्रचार अंतिम टप्प्यात असतानाच प्रत्यक्ष मतदान होण्यापूर्वीच अनेक प्रभागांतील लढती संपल्या आहेत. उमेदवारी अर्जांच्या छाननीनंतर अनेक ठिकाणी विरोधक मैदानातच न राहिल्याने महायुतीच्या उमेदवारांचा विजय आधीच निश्चित झाला आहे. भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या महायुतीचे राज्यभरात तब्बल ५५ नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत.
या बिनविरोध विजयांमध्ये भाजपचा वाटा सर्वाधिक असून, त्याखालोखाल शिवसेना (शिंदे गट) आणि अजित पवार गटाची राष्ट्रवादी आहे. मालेगावमध्ये इस्लाम पार्टीचा एक उमेदवारही बिनविरोध निवडून आल्याने निवडणूक चित्र अधिक ठळक झाले आहे.कल्याण–डोंबिवली महानगरपालिकेत महायुतीने सर्वाधिक म्हणजेच २१ जागांवर बिनविरोध यश मिळवले आहे. अनेक प्रभागांमध्ये विरोधी पक्षांचे उमेदवार नसणे किंवा अर्ज बाद होणे याचा थेट फायदा महायुतीला झाला असून, येथे विरोधक पूर्णपणे निष्प्रभ ठरले आहेत.जळगावमध्ये १२ नगरसेवक बिनविरोध निवडून आले असून, येथे भाजप आणि शिंदे गटाची शिवसेना निर्णायक स्थितीत आहे. भिवंडीमध्ये ७ नगरसेवक बिनविरोध झाले आहेत, तर ठाण्यातही शिंदे गटाच्या शिवसेनेने अनेक प्रभागांमध्ये आपली ताकद दाखवली आहे.
पनवेल, पुणे, पिंपरी-चिंचवड, धुळे आणि अहिल्यानगर या शहरांमध्येही महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. अहिल्यानगरमध्ये अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीला दोन जागांवर यश मिळाले, तर पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपने आपली पकड अधिक मजबूत केली आहे.मतदानाआधीच एवढ्या मोठ्या संख्येने महायुतीचे नगरसेवक निवडून आल्याने राज्याच्या राजकारणात मोठी हालचाल निर्माण झाली आहे. उर्वरित जागांवर होणाऱ्या प्रत्यक्ष लढतीत महाविकास आघाडी महायुतीच्या या आघाडीला कितपत आव्हान देऊ शकते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

