मुंबई : मुंबईसारख्या महानगरात ज्या पद्धतीने मतदान प्रक्रिया पार पडली, ती अत्यंत गंभीर आणि चिंताजनक असल्याचा आरोप शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी केला आहे. मतदानादरम्यान मोठ्या प्रमाणावर मतदारांची नावे मतदारयादीतून गायब असल्याचे त्यांनी सांगत निवडणूक आयोगावर थेट निशाणा साधला.
संजय राऊत म्हणाले की, शिवसेना (UBT), मनसे तसेच काँग्रेस विचारसरणीच्या भागांतील हजारो मतदारांची नावे मतदारयादीत आढळून आली नाहीत. विशेष म्हणजे, याच मतदारांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मतदान केले होते. असे असतानाही त्यांची नावे अचानक गायब होणे हा निव्वळ योगायोग नसून गंभीर बाब असल्याचा आरोप त्यांनी केला.
यासोबतच अनेक मतदान केंद्रांवर ईव्हीएम मशीन नीट काम करत नसल्याच्या तक्रारी आल्याचेही राऊत यांनी नमूद केले. या संदर्भात वारंवार तक्रारी करूनही निवडणूक आयोग आमचे म्हणणे ऐकून घेण्यास तयार नाही, असा आरोप त्यांनी केला.
संजय राऊत यांनी आणखी एक गंभीर प्रश्न उपस्थित करत सांगितले की, आचारसंहिता अद्याप लागू असताना काल भाजपचे वरिष्ठ नेते आणि निवडणूक आयोगाचे कर्मचारी यांच्यात बैठक कशासाठी झाली? या बैठकीमागे नेमका काय हेतू होता, याचे स्पष्टीकरण आयोगाने द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली.
दरम्यान, संपूर्ण मतदान प्रक्रियेची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी आणि मतदारांचा लोकशाही हक्क डावलला जाणार नाही, याची खात्री निवडणूक आयोगाने द्यावी, अशी मागणी शिवसेना (ठाकरे गट)कडून करण्यात येत आहे.

