कोल्हापूर : जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील दानोली गावात खंडणीच्या उद्देशाने एका भाजी व्यापाऱ्याची अत्यंत निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. २५ लाख रुपयांची खंडणी न दिल्याने व्यापाऱ्याचे अपहरण करून त्याचा अमानुष छळ करत त्याला ठार मारण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत व्यापाऱ्याचे नाव भरतेश्वर राजगोंडा तोपगोंडा (वय ४०) असे आहे. सोमवारी रात्री ते घरी परतत असताना आरोपींनी त्यांना रस्त्यात अडवून जबरदस्तीने अपहरण केले. त्यानंतर आरोपींनी त्यांच्या मोबाइल फोनवरून कुटुंबीयांना संपर्क साधत २५ लाख रुपयांची खंडणी मागितली.
आरोपींनी भरतेश्वर यांच्या चुलतभावाला फोन करून रक्कम घेऊन येण्यास सांगितले. मात्र, समोरासमोर बोलण्याची मागणी होताच आरोपींनी फोन कट केला आणि त्यानंतर या प्रकरणाला आणखी गंभीर वळण लागले.
मंगळवारी सकाळी व्यापाऱ्याची कार आणि चपला आढळून आल्या. त्यानंतर दुपारी उसाच्या शेतात त्यांचा मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ उडाली. मृतदेहावरील जखमा पाहून पोलिसही स्तब्ध झाले.
प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, आरोपींनी धारदार शस्त्राने त्यांच्या कानामागे खोल वार केले तसेच विजेचा धक्का देऊन त्यांचा अमानुष छळ केला. त्यानंतर गळा दाबून त्यांची हत्या करण्यात आल्याचा पोलिसांचा संशय आहे. मध्यरात्रीच्या सुमारास ही हत्या झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, या घटनेनंतर गावकऱ्यांमध्ये आणि कुटुंबीयांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. कुटुंबीयांनी पोलिसांवर निष्काळजीपणाचा आरोप करत, रात्रीच खंडणीच्या फोनची माहिती दिली होती, तरीही योग्य वेळी कारवाई न झाल्याने ही घटना घडल्याचा दावा केला आहे.
जयसिंगपूर पोलिसांनी तातडीने कारवाई करत या प्रकरणातील दोन मुख्य आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

