नागपूर/अहमदाबाद: बॉलिवूड अभिनेता सोनू सूद यांनी पुन्हा एकदा सामाजिक बांधिलकी जपत पशुकल्याणासाठी पुढाकार घेतला आहे. गुजरातमधील एका गोशाळेला त्यांनी तब्बल २२ लाख रुपयांची देणगी दिली असून, या गोशाळेत परित्यक्त, जखमी तसेच वाचवलेल्या जनावरांची काळजी, संरक्षण आणि सन्मानाने देखभाल केली जाते.
गोशाळेच्या कार्याचा अनुभव घेतल्यानंतर सोनू सूद यांनी समाधान व्यक्त केले. “गोशाळेचा प्रवास पाहून मला खूप अभिमान वाटतो. काही मोजक्या गायींपासून सुरू झालेला हा उपक्रम आज सात हजार गायींपर्यंत पोहोचला आहे. हे केवळ आमच्यासाठीच नव्हे, तर प्रत्येक गावातील प्रत्येक व्यक्तीसाठी अभिमानाची बाब आहे,” असे त्यांनी सांगितले.
पुढे ते म्हणाले, “मला मिळालेल्या प्रेमामुळे मी खूप आनंदी आणि अभिमानित झालो आहे. मी इथे पुन्हा पुन्हा येत राहीन. इथे ज्या पद्धतीने गोसंरक्षण केले जाते, ते संपूर्ण भारतात राबवले गेले पाहिजे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.सोनू सूद यांच्या शब्दांतून गोशाळेतील मानवता, करुणा आणि जबाबदारीचे दर्शन घडते. सामाजिक कार्यांप्रती त्यांची असलेली बांधिलकी यानिमित्ताने पुन्हा अधोरेखित झाली आहे.
दरम्यान, रविवारी सोनू सूद यांनी आपल्या X (ट्विटर) अकाउंटवर गोशाळेतील गायींसोबतचे काही फोटो शेअर केले. “त्या काहीही मागत नाहीत, फक्त काळजी हवी. आमच्या गायी आणि गोशाळांसोबत उभा आहे,” असे भावनिक कॅप्शन त्यांनी दिले.दरम्यान, सोनू सूद यांचा अलीकडील चित्रपट ‘फतेह’ जानेवारी २०२५ मध्ये प्रदर्शित झाला असून, या चित्रपटातून त्यांनी दिग्दर्शनात पदार्पण केले आहे. चित्रपटात अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसही प्रमुख भूमिकेत आहे.

