पालघर : शिष्यवृत्तीविषयी माहिती घेण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात गेलेल्या १७ वर्षीय विद्यार्थिनीशी गैरवर्तन झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी संबंधित कर्मचाऱ्याविरोधात पोलिसांनी पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १ एप्रिल रोजी ही घटना घडली. पीडित विद्यार्थिनी आपल्या बहिणीसह शिष्यवृत्तीबाबत चौकशी करण्यासाठी जिल्हा परिषद कार्यालयात आली होती. यावेळी शिक्षण विभागातील ४५ वर्षीय कर्मचाऱ्याने फाईल दाखवण्याच्या आणि माहिती देण्याच्या बहाण्याने तिच्याशी अयोग्य वर्तन केल्याचा आरोप आहे.
या प्रसंगात विद्यार्थिनीने धैर्य दाखवत आरोपीला तत्काळ जाब विचारला आणि त्याला चापटही मारली. त्यानंतर ती थेट पोलीस ठाण्यात पोहोचून घडलेल्या प्रकाराची तक्रार दाखल केली.
तक्रारीनंतर पालघर पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहिता तसेच बालकांवरील लैंगिक अत्याचार प्रतिबंधक (POCSO) कायद्यांतर्गत विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी या घटनेवर प्रतिक्रिया देताना सांगितले की, संबंधित कर्मचारी मेहनती म्हणून ओळखला जात होता, मात्र अशा प्रकाराची घटना अत्यंत गंभीर आहे. पोलीस तपासानंतर पुढील कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
प्रशासनाने स्पष्ट केले असून, दोषी आढळल्यास संबंधिताला कोणतीही सवलत दिली जाणार नाही.

