नागपूर : गिट्टीखदान परिसरातून बेपत्ता झालेल्या १४ वर्षीय मुलाचा मृतदेह भरतवाडा येथे आढळून आल्याने शहरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. अथर्व दिलीप नैनोरे या मुलाची निर्दयीपणे हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात असून, त्याचा मृतदेह बोऱ्यात बंद अवस्थेत रिंगरोडलगत टाकून दिला होता.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हनुमान जन्मोत्सवानिमित्त आयोजित मिरवणुकीदरम्यान अथर्व शेवटचा गिट्टीखदान भागात दिसला होता. मिरवणूक संपल्यानंतर तो अचानक बेपत्ता झाला. कुटुंबीयांनी तातडीने शोधाशोध सुरू केली, मात्र काहीच माहिती मिळाली नाही. अखेर पोलिसांत बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली.
दरम्यान, भरतवाडा परिसरात संशयास्पद बोरा आढळल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. बोरा उघडताच त्यामध्ये मुलाचा विद्रूप अवस्थेतील मृतदेह आढळून आला. हात-पाय बांधलेल्या स्थितीत मृतदेह सापडल्याने हा खून अत्यंत नियोजनबद्ध असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी गिट्टीखदान पोलिस ठाण्यासमोर जमून पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले. वेळेत तपास न केल्याचा आरोप करत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.
सध्या पोलिसांनी या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू केला असून, आरोपींचा शोध घेण्यासाठी विविध पथके कार्यरत आहेत. या धक्कादायक घटनेमुळे नागपूरकरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी जोर धरत आहे.

