नागपूर : चित्रपटसृष्टीतील श्रीमंत अभिनेत्रींचा उल्लेख झाला की आजच्या घडीला जुही चावला यांचे नाव घेतले जाते. मात्र सत्तरच्या दशकात एक अशी अभिनेत्री होती, जिने केवळ अभिनयातच नव्हे तर राजकारणातही अफाट यश मिळवत प्रचंड संपत्ती उभी केली. त्या म्हणजे तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जे.जयललिता .
१४० हून अधिक चित्रपट, एकच हिंदी फिल्म-
जयललितांनी बालकलाकार म्हणून अभिनयाची सुरुवात केली. दिग्गज अभिनेते व माजी मुख्यमंत्री M. G. रामचंद्रन यांच्यासोबत त्यांनी जवळपास २८ चित्रपट केले. तमिळ, तेलुगू आणि कन्नड अशा विविध भाषांमध्ये सुमारे १४० चित्रपटांत त्यांनी भूमिका साकारल्या.
हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी १९६८ मधील इज्जत या चित्रपटातून झळकले. या चित्रपटात धर्मेद्र आणि तनुजा प्रमुख भूमिकेत होते. मात्र हिंदीत त्यांनी यानंतर काम केले नाही. केवळ ३१व्या वर्षी त्यांनी चित्रपटांना अलविदा करत राजकारणाचा मार्ग स्वीकारला.
‘अम्मा’ म्हणून लोकप्रियता-
राजकारणात प्रवेश केल्यानंतर जयललिता यांनी तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदापर्यंत मजल मारली. ‘अम्मा’ या नावाने त्या राज्यभर प्रसिद्ध झाल्या. त्यांच्या कार्यकाळात अनेक लोककल्याणकारी योजना राबवण्यात आल्या, ज्यामुळे त्यांची लोकप्रियता अधिक वाढली.
संपत्तीमुळे वाद-
जयललितांच्या संपत्तीची चर्चा मात्र वारंवार रंगली. १९९७ मध्ये त्यांच्या निवासस्थानी झालेल्या आयकर छाप्यात १०,५०० साड्या, सुमारे २८ किलो सोने, १,२५० किलो चांदी आणि इतर मौल्यवान वस्तू आढळल्याचे वृत्त होते. अधिकृत कागदपत्रांतील संपत्ती आणि प्रत्यक्ष मालमत्ता यामध्ये मोठी तफावत असल्याचे आरोपही झाले होते.त्या काळात त्यांच्या मालमत्तेची किंमत कोट्यवधींमध्ये असल्याचे सांगितले जात होते. त्यामुळे त्या त्या वेळच्या सर्वात श्रीमंत अभिनेत्रींपैकी एक मानल्या जात.
२०१६ मध्ये पडदा-
२०१६ साली, वयाच्या ६८व्या वर्षी जयललिता यांचे निधन झाले. मात्र पडद्यावरची स्टार आणि राज्यकारभार सांभाळणारी ताकदवान नेत्या अशी दुहेरी ओळख त्यांनी इतिहासात कायमस्वरूपी नोंदवून ठेवली. त्यांच्या संपत्तीइतकीच त्यांची कारकीर्दही आजही चर्चेत राहते.

