नागपूर : मालमत्ता कर वाढीच्या हालचालीनंतर आता नागपूर महानगरपालिकेकडून पाणी दर वाढवण्याचे संकेत मिळत आहेत. जलप्रदाय विभागाने पाण्याच्या दरात 5 टक्क्यांची वाढ सुचवणारा प्रस्ताव प्रशासनाकडे सादर केला असून, या निर्णयामुळे शहरातील नागरिकांच्या खिशावर अतिरिक्त भार पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सध्याच्या महागाईच्या परिस्थितीत ही संभाव्य दरवाढ नागपूरकरांसाठी चिंतेची बाब ठरत आहे. विशेष म्हणजे, 2023 नंतर प्रथमच पाणी दर वाढवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
नागपूर शहरातील जलदर मूल्यांकन व वसुली उपनियम 2009 अंतर्गत मनपा आयुक्तांना एका आर्थिक वर्षात 5 टक्क्यांपर्यंत दरवाढ करण्याचे अधिकार आहेत. यासाठी सर्वसाधारण सभेची परवानगी आवश्यक नसते. आयुक्तांच्या मंजुरीनंतर हा प्रस्ताव स्थायी समितीसमोर केवळ माहितीस्तव मांडला जाणार आहे.
प्रशासनाच्या माहितीनुसार, प्रस्तावित वाढ सर्व प्रकारच्या ग्राहकांना लागू होणार आहे. याआधी 2024 आणि 2025 या कालावधीत कोरोना आणि महागाईचा विचार करून दरवाढ टाळण्यात आली होती.
दरम्यान, शहरात सध्या चुकीचे बिल, मीटरच्या समस्या आणि अनियमित पाणीपुरवठा यांसारख्या अडचणी कायम आहेत. त्यामुळे या मूलभूत समस्यांचे निराकरण न करता दरवाढ करण्याच्या निर्णयावर नागरिक आणि सामाजिक संघटनांकडून नाराजी व्यक्त होत आहे.
याउलट, वाढत्या देखभाल खर्चामुळे आणि आर्थिक दडपणामुळे ही दरवाढ अपरिहार्य असल्याचे मनपा प्रशासनाचे म्हणणे आहे. आता या प्रस्तावावर अंतिम निर्णय काय घेतला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



