तुमसर : तालुका कृषी अधिकारी कार्यालय तुमसरच्या वतीने तहसील कार्यालयाच्या सभागृहात १८ ते ४० वयोगटातील तरुण शेतकऱ्यांसाठी ‘भंडारा युवा शेतकरी मंच’ अंतर्गत विशेष कार्यशाळेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. ही कार्यशाळा प्रामुख्याने दोन टप्प्यात पार पडली, ज्यामध्ये पहिल्या टप्प्यात १७ फेब्रुवारी रोजी तुमसर मंडळातील तरुण शेतकरी आणि दुसऱ्या टप्प्यात २६ फेब्रुवारी रोजी सिहोरा मंडळातील तरुण शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.
कार्यशाळेत तालुका कृषी अधिकारी दुर्गेश्वरी एकतपुरे यांनी शेती क्षेत्रातील रोजगाराच्या विविध संधी आणि यशस्वी शेतकऱ्यांच्या यशोगाथांचे सविस्तर सादरीकरण केले. यावेळी मंडळ कृषी अधिकारी आदित्य तलमले यांनी कृषी विभागाच्या विविध शासकीय योजनांची माहिती देऊन तरुण शेतकऱ्यांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन केले. या कार्यशाळेत सहभागी झालेल्या युवा शेतकऱ्यांकडून त्यांचे कृषी क्षेत्रातील स्वारस्य आणि गरजा जाणून घेण्यासाठी प्रतिसाद अर्ज भरून घेण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने फळबाग, पशुपालन, कुक्कुटपालन, मत्स्यपालन, भाजीपाला लागवड, मशरूम उत्पादन आणि शेतीपूरक व्यवसाय या विषयांकडे तरुणांचा मोठा कल दिसून आला. प्राप्त झालेल्या अर्जांची पडताळणी करून लवकरच जिल्हास्तरावर अशा विशेष कार्यशाळांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन भारत धुमोने यांनी केले, तर कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी उपकृषी अधिकारी विलास फासे, सहायक कृषी अधिकारी गजानन माहुले, अनंता तितिरमारे, युगल हुकरे, नेहा बाहे आणि कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मोलाचे योगदान दिले.



