शिवनेरी : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलिनीकरणाबाबत सुरू असलेल्या चर्चांना नव्या घडामोडींची किनार मिळाली आहे. खासदार Supriya Sule यांनी शिवनेरी येथे माध्यमांशी संवाद साधताना सूचक भूमिका मांडली. “आम्हाला एकत्र काम करण्याची इच्छा आहे; कालही होती, आजही आहे आणि उद्याही राहील. मात्र या विषयाला सध्या पूर्णविराम देऊया,” असे त्या म्हणाल्या.
गेल्या काही दिवसांत दोन्ही राष्ट्रवादी गटांतील नेत्यांच्या बैठकींनी राजकीय वर्तुळात चर्चा रंगवल्या होत्या. अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात बैठकांचे सत्र झाल्याच्या बातम्या समोर आल्या. बैठकींची ठिकाणे, सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसलेले नेते यामुळे राजकीय वातावरणात खळबळ उडाली होती. या सर्वांवर भाष्य करताना सुळे यांनी यापूर्वी “रामकृष्ण हरी” असे म्हणत चर्चांना विराम देण्याचा प्रयत्न केला होता.
रोहित पवारांच्या सुरक्षेची मागणी
या वेळी त्यांनी Rohit Pawar यांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली. “रोहित अनेक ज्वलंत मुद्दे मांडत आहेत. तरुणांमध्ये अस्वस्थता आहे. पवार कुटुंबासह लाखो लोकांच्या मनात प्रश्न आहेत. त्यामुळे सरकारने रोहित पवारांना सुरक्षा द्यावी,” अशी ठाम मागणी त्यांनी केली.तसेच पार्थ आणि जय यांनाही या घडामोडींमुळे धक्का बसल्याचे सूचित करत त्यांनी भावनिक सूर लावला. “आम्हाला मोठ्यांविरुद्ध बोलणं आवडत नाही. वास्तव माझ्या दादाला माहिती होतं आणि मला माहिती आहे,” असे त्या म्हणाल्या.
अमोल कोल्हेंबाबत भाष्य टाळले
महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका दोन्ही गटांनी एकत्र लढाव्यात, तसेच अमोल कोल्हे यांना महत्त्वाची जबाबदारी देण्याच्या चर्चांबाबत विचारले असता सुळे यांनी थेट उत्तर देणे टाळले. “अमोल दादा यांनी पक्षाची भूमिका सविस्तर मांडली आहे. वेगळं मला बोलावंसं वाटत नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.
विमान अपघातावर उच्चस्तरीय चौकशीची मागणी
दरम्यान, अलीकडील विमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर संसदेत उच्चस्तरीय चौकशीची मागणी केल्याचेही त्यांनी सांगितले. “पारदर्शक माहिती मिळेपर्यंत आमची मागणी सुरू राहील,” असे ठामपणे नमूद करत त्यांनी या प्रकरणात सरकारने स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.एकंदरित, विलिनीकरणाचा मुद्दा सध्या थंड बस्त्यात गेला असला तरी एकत्र काम करण्याची इच्छा कायम असल्याचा स्पष्ट संदेश सुप्रिया सुळे यांनी दिला आहे. राष्ट्रवादीच्या राजकारणात पुढील काही दिवसांत कोणती नवी घडामोड घडते, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.



