तुमसर : तालुक्यातील खापा-खरबी राष्ट्रीय महामार्गावर धुलीवंदनाच्या दिवशी ३ मार्च रोजी दुपारी एका भीषण अपघाताने परिसर हादरून गेला. भरधाव कारने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत एका २९ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचे दोन मित्र गंभीर जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे, अवघ्या तीन दिवसांनंतर मृत युवकाचा वाढदिवस होता, मात्र त्याआधीच त्याच्यावर काळाने झडप घातल्याने खरबी गावावर शोककळा पसरली आहे.
सदर अपघातात प्रशांत पुरूषोत्तम कांबळे (२९) रा.खरबी हा जागिच ठार झाला तर विकास अशोक गोमासे (२८) व भुषण गजानन सिंगनजुडे (२८) रा. खरबी हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना भंडारा येथील रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
प्रशांत कांबळे हा ३ मार्च रोजी धुलीवंदनाच्या दिवशी दुपारच्या सुमारास आपल्या दोन मित्रांसह दुचाकीने गावाकडे परत येत असताना खरबी शिवारातील ढाब्यासमोर येणाऱ्या भरधाव कारने क्रमांक MH 35 AG 8117) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्या अपघातात प्रशांतचा जागीच मृत्यू झाला, तर दुचाकीवर मागे बसलेले विकास अशोक गोमासे व भूषण गजानन सिगंनजुडे हे दोघे मित्र गंभीर जखमी झाले.
मार्गावरील उभे ट्रक ठरले मृत्यूचा सापळा?
हा अपघात खापा-खरबी शिवारातील एका ढाब्यासमोर उभा असलेल्या ट्रकमुळे घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनांमुळे रस्ता अरुंद झाला आणि समोरून येणाऱ्या कारचा अंदाज न आल्याने हा भीषण अपघात घडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. धडक देणारी कार तिरोडा येथील 'बचवानी' नामक कंत्राटदाराची असल्याची माहिती समोर आली आहे.
संतप्त ग्रामस्थ आक्रमक....
घटनेची माहिती मिळताच गावातील व परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. मृताच्या कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत मिळावी, या मागणीसाठी संतप्त नागरिक आक्रमक होत महामार्गावर ठिय्या मांडला होता . यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनेचे गांभीर्य ओळखून मोहाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मध्यस्थी केली. मागण्या मान्य करण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर नागरिक नमते झाले. व महामार्गावरील वाहतूक सुरळीत झाली.
सदर घटनेचा मोहाडी पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी तुमसर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. शवविच्छेदनानंतर मृतदेह शोकाकुल वातावरणात नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले. मृतक प्रशांतच्या मृतदेहावर खरबी स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. सदर घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरेंद्र बेलखेडे, उपनिरीक्षक चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली मोहाडी पोलीस करीत आहेत.



