भंडारा : जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यात एक अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. कौटुंबिक नात्यांना काळीमा फासणाऱ्या या प्रकारात दिराने स्वतःच्या वहिनीचा गळा चिरून खून केल्याची घटना समोर आली आहे.
मृत महिलेचे नाव माधुरी अंबादे (वय ३२) असे असून, तिचा पती काही काळापूर्वीच निधन पावला होता. ती आपल्या ८ वर्षांच्या मुलीसोबत राहत होती. दरम्यान, तिचे दिर गौरव अंबादे (वय २५) याच्यासोबत जवळीक वाढून त्यातून प्रेमसंबंध निर्माण झाले होते.
दोघेही मूळचे चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथील असून, भंडारा जिल्ह्यातील पालांदूर येथे एका नातेवाईकांच्या विवाहासाठी आले होते. त्यानंतर भागडी गावात रात्री मुक्कामादरम्यान दोघांमध्ये लग्नाच्या मुद्द्यावरून वाद झाला.
माधुरीने लग्नास स्पष्ट नकार दिल्यानंतर संतप्त झालेल्या गौरवने धारदार शस्त्राने तिचा गळा चिरत निर्घृण हत्या केली. या घटनेदरम्यान बाजूलाच झोपलेल्या मुलीला जाग आली आणि तिने आरडाओरडा केला. त्यामुळे आरोपीने तात्काळ दुचाकीवरून घटनास्थळावरून पळ काढला.
पोलीस तपास सुरू या प्रकरणी लाखांदूर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून फरार आरोपीचा शोध सुरू आहे. प्राथमिक तपासात ही हत्या प्रेमसंबंधातील वादातून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पुढील तपास सुरू आहे.



