नागपूर : आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानतर्फे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला उपस्थित राहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आग्रा किल्ल्यावर शिवरायांचे भव्य स्मारक उभारण्याचा संकल्प जाहीर केला. उत्तर प्रदेश सरकारच्या सहकार्यामुळे हा सोहळा यशस्वी झाल्याचे त्यांनी नमूद केले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सकाळी किल्ले शिवनेरी येथे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केल्यानंतर सायंकाळी थेट आग्रा गाठत आग्रा किल्ला परिसरात मानवंदना दिली. शिवाजी महाराजांना ज्या ठिकाणी नजरकैदेत ठेवण्यात आले होते, त्या जागेचे अधिग्रहण करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. त्या ठिकाणी ऐतिहासिक महत्त्व जपणारे स्मारक उभारण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.
पत्रकारांशी संवाद साधताना फडणवीस म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करून स्वाभिमानाचा नवा इतिहास घडवला. त्यांच्या जीवनप्रवासात आग्र्याला विशेष स्थान आहे. महाराजांचे शौर्य, दूरदृष्टी आणि गनिमी काव्याची रणनीती यांचे स्मरण करण्यासाठी दरवर्षी येथे येणे आपल्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे विशेष आभार मानले.
उत्तर प्रदेश सरकारने स्मारकासाठी जागा निश्चित केल्याचे सांगत फडणवीस यांनी लवकरच त्या ठिकाणी भव्य स्मारक साकारले जाईल, असा विश्वास व्यक्त केला. २०३० साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आग्रा किल्ल्यावर शिवजयंती साजरी करण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला.
फडणवीस यांनी पुढे सांगितले की, आग्रा किल्ला हा स्वाभिमान आणि इतिहासाची साक्ष देणारा परिसर आहे. शिवाजी महाराजांचा इतिहास देशभरातील शैक्षणिक अभ्यासक्रमात योग्य स्थान मिळणे आवश्यक आहे. पूर्वी इतिहासाच्या पुस्तकांत मुघलकालीन घटनांना अधिक जागा देण्यात आली होती; मात्र आता शिवचरित्राला अधिक सविस्तर स्थान मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.
छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम, स्वराज्याची संकल्पना आणि राष्ट्राभिमान यांची प्रेरणा भावी पिढ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आग्रा येथील स्मारक महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.



